मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांच्या विधानांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली असल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला आहे. त्यानंतर आता या आमदारांवर जोरदार घणाघात करणा-या राऊतांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख आमचे जुने सहकारी असा केला आहे.
राऊतांचा बदलला सूर
शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली होती. त्यामुळे या सर्व आमदारांनी संजय राऊत यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांना बंडखोर न म्हणता त्यांचा उल्लेख आमचे जुने सहकारी असा केला आहे. राऊतांच्या या बदललेल्या सूरामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
(हेही वाचाः पडळकरांना मंत्री पद द्यावं, कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र अन्…)
गोगावले, शहाजीबापूंची यांची टीका
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी बुधवारी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांच्या विधानांमुळेच आज ही वेळ आली असून, त्यांनी केलेली विधाने ही काळजाला घरं पाडणारी असल्याचे भरत गोगावले यांनी म्हटले होते. तर शहाजीबापू पाटील यांनी देखील राऊत यांनी किमान पाच वर्ष तरी टीव्हीसमोर येऊन भांडणं लावू नयेत, असं म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला होता.
Join Our WhatsApp Community