राणेंमुळे फडणवीस मागे पडले… राऊतांचे मत

राणेंना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे भविष्यात सगळ्यात जास्त फटका भाजपलाच बसेल.

135

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना भाजप नेत्यांनी पाठींबा दिला. यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. सामनातील रोखठोक या संपादकीय सदरात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक मधून नारायण राणे यांच्यावर टीका करतानाच त्यांच्यामुळे भाजपचे कसे नुकसान होत आहे, यावर भाष्य केले. राणेंसारख्या भाजपचा मुखवटा घातलेल्या नेत्यांमुळे देवेंद्र फडणवीस मागे पडत आहेत, असे परखड मत सामनातून मांडण्यात आले आहे.

भाजपच्या घरघरीची सुरुवात

शिवसेना सत्तेत येण्यासाठी बधत नाही याची खात्री पटल्यावर राणेंना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे भविष्यात सगळ्यात जास्त फटका भाजपलाच बसेल, असे भाकीतही संजय राऊत यांनी रोखठोक मधून व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या घरघरीची ही सुरुवात आहे. भाजपमधले आशिष शेलारांसारखे नेते ठरवून बाजूला करण्यात आले आहेत. आज राणे, प्रसाद लाड यांसारखे नेते भाजपचा मुखवटा म्हणून वेगळे प्रताप घडवीत आहेत व देवेंद्र फडणवीस मागे पडत आहेत, असे मत रोखठोक मधून संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः राणेंची यात्रा म्हणजे येड्यांची जत्रा… राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका)

परिणाम भोगावे लागतील

राणेंना भाजपने केंद्रीय मंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवली पण यामुळे भाजपचे नुकसान होत आहे, अशी टीका सामनामधून राऊत यांनी केली आहे. राणे बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवत नाहीत हे त्यांचे सगळ्यात मोठे भांडवल आहे. भाजपकडे हे भांडवल तोकडे पडत असल्यानेच आता भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणा-या बाहेरच्या लोकांची भरती सुरू आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हे असे डावपेच खेळवले जात आहेत पण यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही, उलट याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही रोखठोक मधून देण्यात आला आहे.

भाजप अस्तित्व हरवत आहे

भाजपला भविष्यात अस्वस्थता आणि अस्थिरतेची वाळवी लागेल. राणेंमुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी सरळ फाळणी होईल. त्या विघटनाची सुरुवात होत आहे. या सगळ्या वातावरणामुळे भाजप स्वतःची ओळख आणि अस्तित्व हरवताना दिसत आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

(हेही वाचाः तीन पक्षांचे सरकार चालवताना अजित पवारांनी चक्क चालवली रिक्षा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.