मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरुन दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटमची डेडलाईन 4 मे (बुधवारी) संपणार आहे. यावर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, हे जे बोलत आहेत त्यांच्या मागे एक शक्ती काम करत आहे. लढायचे असेल तर समोरुन लढा. अशा सुपा-या देऊन काय लढता असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मनसे उपवस्त्र राऊतांचा आरोप
कोणाच्याही अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. राज्य मजबूत पायावर उभे आहे. कोणीही उठतो आणि धमकी देतो. धमकी देणा-यांमध्ये ताकद नाही. त्यांच्या मागची शक्ती अस्वस्थ आहे. त्यांचं वैफल्य ते दुस-यांच्या माध्यमातून बाहेर काढतात. दुस-यांना सुपा-या देतात. माणसांना वापरण्यासाठी ठेवले जाते त्याला उपवस्त्र म्हणतात, असे म्हणत राऊतांनी मनसेला थेट उपवस्त्र म्हटले आहे.
टिळक विरुद्ध फुले हा वाद योग्य नाही
राऊतांनी राज्यात सुरु झालेल्या टिळक विरुद्ध फुले या वादावरही प्रतिक्रिया दिली. या राज्यात फुलेविरुद्ध टिळक असे वाद लावले जात आहेत, ते निरर्थक आहेत. फुले टिळकांचे वाद निर्माण करुन वादाला फोडणी घालत असेल, तर ते योग्य नाही, असे ते म्हणाले.
( हेही वाचा: त्याच भाषेत उत्तर देऊ… इम्तियाज जलील यांची धमकी )
बेळगावच्या जनतेवर अन्याय झाला
यावेळी त्यांनी बेळगाव विषयीही प्रतिक्रिया व्यक्त केली. बेळगावचा मुद्दा संपलेला नाही. एक इंच जमीन देणार नाही. जमीन काही तुमची नाही. देशाची आहे. बेळगावमधील जनतेवर अन्याय झाला आहे. सध्या न्यायालयात प्रकरण असल्याचे राऊतांनी सांगितले.