पहाटेच्या शपथविधीला २ वर्षे पूर्ण, पाटलांनी आता झोपेतून जागे व्हावे!

139

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या बोलण्याने आमचे सरकार जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल आणि या सरकारचे पॉवर सेंटर जिथे आहे तिथे मी आता उभा आहे. पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखे म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढेच मी त्यांना सांगेन, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

नवीन वर्षात हे सरकार पदार्पण करणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते, त्यावर बोलताना राऊत यांनी पाटलांवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असे विधान केले आहे की, हे सरकार जाईल. त्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहूद्या, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा अजित पवार कधी बोलणार ‘त्या’ शपथविधीविषयी? कधी येणार ती योग्य वेळ?)

आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत

महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का भडकवत आहे, त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहित आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचे काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. कालच शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. आजच्या शरद पवार यांच्या बैठकीतून असे समजले की, त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.