शिवसेना नेते संजय राऊत यांच्या थेट भांडुप येथूल मैत्री बंगल्यावर ईडीच्या १० अधिकाऱ्यांनी रविवारी, ३१ जुलै रोजी धाड टाकली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून ही चौकशी सुरु झाली, त्यावर महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या, मात्र यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रतिक्रियेने सर्वांनी भुवया उंचावल्या. अजित पवार यांनी ईडीच्या कारवाईची निषेध न करता अशा प्रकारे कुणाचीही चौकशी करण्याचा अधिकार केंद्रीय यंत्रणांना आहे, असे सांगत पवार यांनी याविषयावर मोजकेच बोलणे पसंत केले. याउलट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मात्र या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
काय म्हणाले अजित पवार?
रविवारी एकीकडे मुंबईत संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु असताना दुसरीकडे मात्र अजित पवार हे पुण्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत होते. अशा वेळी माध्यमांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता, पवार यांनी, संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची बातमी मला माध्यमांमधूनच समजली. पाठीमागच्या काळात ईडीच्या नोटीस अनेकांना आल्या. ईडी असो वा सीबीआय किंवा आयटी, या सगळ्या संस्थांना तपासाचे अधिकार आहेत. या संस्था स्वायत्त असतात, असे अजित पवार म्हणाले. ईडी संजय राऊतांना वारंवार चौकशीसाठी का बोलावते, त्यांना समन्स का बजावते, यावर संजय राऊतच अधिकारवाणीने बोलू शकतील, असे पवारांनी म्हटले. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेच्या खासदाराच्या घरावर धाडी पडत असताना पवारांनी कारवाईचा निषेधही केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याने शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपाने ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
(हेही वाचा Sanjay Raut ED Raid : काय आहे पत्राचाळ घोटाळा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण)
Join Our WhatsApp Community