संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; 500 कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप, काय आहे प्रकरण?

85

हसन मुश्रीफ, सदानंद कदम यांच्याविरोधातील कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आणखी एक प्रकरण समोर आणले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना भले मोठे पत्र लिहिले आहे. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिला आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

राऊतांनी कोणते आरोप केले आहेत?

पुण्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कारखान्यात 500 कोटी रुपयांचे मनी लाॅंडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर मी गंभीर आहे, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

( हेही वाचा: अर्थसंकल्प : विकासासह प्रचाराचा ‘रोडमॅप’ )

राऊतांचा सोमय्याांना सवाल

विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या भाजपातील भ्रष्टाचारविरोधात का मूग गिळून बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. जनतेच्या पैशांची लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.