ईडीच्या कोठडीत राऊतांचा श्वास गुदमरतोय

168

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची कोठडी संपली, त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयात राऊत यांनी थेट त्यांच्या प्रकृतीची तक्रार केली, तसेच मला हृदयविकाराचा त्रास, ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नाही, असे सांगत कोठडीतील गैरसोयींबद्दल न्यायालयाला माहिती दिली. त्यावर न्यायालयाने ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, असा आदेश दिला.

काय म्हणाले राऊत?

ईडीने मला ज्या ठिकाणी ठेवले आहे, त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही. तिथे माझी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तिच परिस्थिती आहे. हवा येण्यासारखी एकही खिडकी नाही, अशी तक्रार राऊत यांनी केली. राऊत यांच्या या तक्रारीनंतर न्यायालयाने याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मोकळी हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्याची तयारीही दर्शवली आहे.

(हेही वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सततच्या दौ-यामुळे विश्रातींचा सल्ला)

काय आहे ईडीचा दावा?

पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआय घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मध्यस्थ म्हणून काम करत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधी कोर्टात केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.