गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राऊत यांची दिवाळी सुद्धा आता कारागृहातच जाणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 13 दिवसांची वाढ झाली असून 2 नोव्हेंबर रोजी राऊतांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.
न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी जामीन अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे. 21 ऑक्टोबर रोजी राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यानंतर ईडीकडून आपली बाजू मांडण्यात आली.
2 नोव्हेंबरला पुढील सुनावणी
संजय राऊत यांच्या चौकशीत काही नवीन मुद्दे समोर आल्यामुळे ईडीकडून राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. पुढील आठवड्यात दिवाळीनिमित्त न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे 2 नोव्हेंबर पर्यंत तरी संजय राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहात असणार आहे.
Join Our WhatsApp Community