…तर आधी केंद्रातले सरकार पडेल – संजय राऊत

106

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका होत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना जशासतसे उत्तर दिले आहे. सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल असे संजय राऊत यावेळी म्हणालेत. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये असे सांगत राऊतांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.

ही राजकारण करण्याची वेळ नाही 

सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सुशांत सिंहच्या वडिलांच्या दोन लग्नावरुन केलेल्या वक्तव्यावर कुटुंबाने माफी मागण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सागितलं की, “कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही. जर चूक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत आहे”.

मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं 

संजय राऊत यांनी राजस्थानमधील राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या ऑक्टोबरपर्यंतच सरकार टिकणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना प्रयत्न करु देत असे राऊत म्हणालेत. महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शरद पवार तसंच सगळे मंत्री प्रयत्न कत आहेत. त्यातही कोणाला सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावं. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य द्यावं लागतं. प्रधानमंत्र्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राच्या हितावरच बोट ठेवलं होतं,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.