संजय राऊत म्हणाले, ती तर भिजलेली ‘लवंगी’!

भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा ते कोणता तयार करत आहेत याकडे आम्ही पाहत आहोत, असेही राऊत म्हणाले.

132

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे सध्या राज्यात फटाक्यांवर फटाके फुटत असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र खिल्ली उडवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जो काही बॉंब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका होता. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती, अशी टीका त्यांनी केली आहे. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला तर त्याचे महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का, हे पाहत होतो. पण तसे काही दिसले नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून, त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नसल्याचे, संजय राऊत म्हणाले.

त्या अहवालात काडीचाही दम नाही

दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्या दृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाहीत. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही, हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असे काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील, असे देखील राऊत म्हणालेत.

(हेही वाचाः गृहमंत्र्यांमुळे आता काँग्रेसमध्येही दोन गट!)

राज्याचे गृहखाते सक्षम

राज्यात काही चुकीचे झाले तर त्यासाठी राज्यातील गृहखाते सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची इभ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले, अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा ते कोणता तयार करत आहेत याकडे आम्ही पाहत आहोत, असेही राऊत म्हणाले.

राज्यपाल सरकार चालवतात का?

ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन सगळा गोंधळ सुरू आहे त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी येथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्रे अनेक राज्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत, असे राऊत म्हणाले. राज्यपालांना भेटण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना भेटा, राज्यपाल सरकार चालवतात का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी विचारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.