गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. त्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेत काय झाले हे आम्ही बघू यात तिसऱ्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं बघा. शिवाजी पार्कवर शनिवारी भारतीय जनता पक्षाचाच लाऊडस्पीकर वाजत होता. भाजपचेच हे स्क्रीप्ट होते, असे वाटते. टाळ्याही भाजपच्याच होत्या. त्यावर जास्त न बोललेलेच राज्याच्या हिताचे राहील. असेही राऊत यावेळी म्हणाले.
अडीच वर्षांनतर बोलत आहात
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? थोडसं आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? त्याचा आता अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहात. असे म्हणत राऊतांनी ठाकरेंवर टीका केली.
भाजपाने किती भोंगे हटवले
भोंग्याचं काय करायचं? तुमच्या भोंग्याचं काय करायचं? यांच्या भोंग्याचं काय करायचं? त्यासाठी सरकार समर्थ आहे. भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? असा सवाल करतानाच काल शिवतीर्थावरचा भोंगा भाजपचाच होता. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे. पण त्यावर आम्ही फार बोलणार नाही. आमचा दृष्टीकोण विकासाचा आहे. राज्य पुढे न्यायचं आहे. राज्यात संकटं येतात त्यावर मात करून पुढे जायचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची घुसखोरी सुरू आहे, त्याविरोधात लढायचं आहे. हे करत असताना शिवसेनेचा भगवा फडकावायचा आहे, असेही ते म्हणाले.
( हेही वाचा :पवारांनी भूमिका केली स्पष्ट; आता राऊत पडले एकटे? )
ते सुद्धा गमावून बसाल
युतीत निवडणुका लढून दोन्ही काँग्रेससोबत आघाडी का केली या राज ठाकरे यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशात असे अनेकदा झाले. शेवटी बहुमत निर्माण होते तेव्हा सरकार बनते. युतीचे बहुमत झाले नाही. आघाडीचे बहुमत झाले. राज्याच्या स्थैर्यासाठी, खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनले आहे हे त्यांना माहीत आहे. काल मराठीभाषा भवनचे स्वागत करायला हवे होते. एवढे मोठे कार्य काल घडले. त्याबाबत काल बोलले नाही. फक्त टीका करायची. त्यातून काय मिळते आहे. ते सुद्धा गमावून बसाल, असा इशाराही त्यांनी दिला.
Join Our WhatsApp Community