हे तर अ‍ॅक्सिडेंटल ‘होम मिनिस्टर’! देशमुखांबद्दल राऊतांचे ‘रोखठोक’ मत…

आतापर्यंत आपल्याला अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर माहीत होते पण अ‍ॅक्सिडेंटल होम मिनिस्टर पण असतात, हे आज कळलं ना राव... आता प्रश्न असा आहे की, संजयभाऊ आज एवढे ‘रोखठोक’ कसे झाले बुवा, की त्यांनी थेट सरकारमधील मंत्र्याशीच सामना लावावा...

महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना या सराकरच्या वास्तूपुजनापासून ते महाविकास सरकारची इमारत बांधेपर्यंत संजय राऊत यांचा ‘वाघाचा’ वाटा होता. पण आता त्याच संजय राऊत यांनी होम मिनिस्टरवर नाराजी व्यक्त केली आहे. आता होम मिनिस्टर म्हणजे आदेश भावजी नाही हो… आपले गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्याबद्दल बोलतोय आम्ही. हा तर विषय असा आहे की, संजय राऊत हे कायमच सामनातून आपल्या विरोधकांचा कोथळा बाहेर काढत असतात आणि महाविकास आघाडी सरकारची पाठराखण करत असतात. पण आज तर त्यांनी अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळालं, असं म्हटलं की ओह… नाही म्हणजे आतापर्यंत आपल्याला अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर माहीत होते पण अ‍ॅक्सिडेंटल होम मिनिस्टर पण असतात, हे आज कळलं ना राव… आता प्रश्न असा आहे की, संजयभाऊ आज एवढे ‘रोखठोक’ कसे झाले बुवा, की त्यांनी थेट सरकारमधील मंत्र्याशीच सामना लावावा… काही का असेना. गेल्या काही दिवसांतल्या धक्क्यांसारखाच हा पण एक धक्का समजू आणि नेमकं संजय भाऊ काय म्हणाले ते बघू…

काय आहे राऊतांचे ‘रोखठोक’?

गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय आहे. गृहमंत्र्यांनी वाझेंना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले. महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणा-या घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडत आहेत. जे राष्ट्र आपले चारित्र्य सांभाळण्याची दक्षता घेत नाही ते राष्ट्र जवळजवळ नामशेष झाल्यासारखेच आहे असे खुशाल समजावे. जे राष्ट्र सत्य, सचोटी, सरळपणा आणि न्यायनिष्ठा या सद्गुणांची किंमत जाणत नाही आणि त्या गुणांना मानत नाही ते राष्ट्र जिवंत राहण्यालादेखील पात्र नसते. विलासी वृत्ती हेच ज्या राष्ट्राचे दैवत आहे, ज्या राष्ट्रातील लोक केवळ स्वतःसाठीच जगतात किंवा जेथे एखादी छोटी व्यक्ती स्वतःला देव समजते त्या राष्ट्राचे दिवस भरत आले आहेत, असे खुशाल समजावे.

(हेही वाचाः …म्हणून वाझेचे सारे मालक चिंतेत! देवेंद्र फडणवीसांचा टोला!)

आज आपल्या देशाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाबतीत हे प्रश्न विचारले जात आहेत याचे दुःख वाटते. महाराष्ट्राचे एक मंत्री संजय राठोड यांना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण खाली बसत नाही तोच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याचे प्रकरण आजही खळबळ माजवत आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपपत्रामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून जावे लागेल व सरकार डळमळीत होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी काहीच घडले नाही. तरीही देशभरात या सर्व प्रकरणावर चर्चा झाली व महाराष्ट्राची बदनामी झाली!

विरोधी पक्षाला सरकार पाडण्याची घाई

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. पण अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळ्यात आधी जावे लागेल. असा टोला राऊत यांनी रोखठोक मधून लगावला आहे.

(हेही वाचाः सनराईस हॉस्पिटल आग : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! भाजपची मागणी!)

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काय घडले?

मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सिंग हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलिस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केला. पुन्हा हे टार्गेट कुणाला दिले, तर मनसुख हिरेनच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंना. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलिस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलिस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खरा चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?

अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे, दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, हे विसरून कसे चालेल? अशी टीका राऊत यांनी सामनातून केली आहे.

(हेही वाचाः फोन टॅपिंग अहवालाबाबत फडणवीसांनी काय केला गौप्यस्फोट? वाचा… )

सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची यंत्रणा नाही

परमबीर सिंग यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले, पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तात्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधीमंडळात केला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या आरोपांना कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते व मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला, हे चित्र भयंकर होते.

मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन फोन टॅपिंग

रश्मी शुक्ला व सुबोध जयस्वाल या बड्या अधिकाऱ्यांनी पोलिस खात्यातील काही बदल्यांसंदर्भात व्यवहार होत असल्याची माहिती मिळताच यासंदर्भातील दलालांचे फोन टॅप केले. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. हे फोन टॅपिंग व त्यातून मिळालेली माहिती हे गौडबंगाल आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेऊन हे फोन टॅपिंग झाले. पण या संभाषणात ज्या अधिकाऱ्यांची नावे आली त्यातील एकाही अधिका-याची बदली संभाषणात ऐकू येते त्याप्रमाणे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे बदल्यांत भ्रष्टाचार हा आरोप खोटा! या खोट्या माहितीचा अहवाल घेऊन आपले विरोधी पक्षनेते फडणवीस हे दिल्लीत आले. केंद्रीय गृह सचिवांना भेटले व सीबीआय चौकशीची मागणी केली. हा प्रकार हास्यास्पद आहे. असे म्हणत राऊत यांनी आपल्या विरोधकांना चिमटा काढला आहे.

(हेही वाचाः फोन टॅपिंगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध तक्रार! )

राज्यपालांवरही टीका

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. अँटिलिया व परमबीर सिंग लेटर प्रकरणात तरी हे सरकार जाईलच या आशेवर ते होते. त्यावरही पाणी पडले. पुन्हा महाराष्ट्रातील भाजप नेते ऊठसूट राज्यपालांना भेटतात. सरकार बरखास्तीची मागणी करतात. त्यामुळे राजभवनाची प्रतिष्ठाही काळवंडली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here