राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत आहेत. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले.
राऊत पुढे म्हणाले की, द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदासाठी निवडलेल्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. शिवसेनेतही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. काल निर्मला गावित, आमशा पाडवी, शिवाजीराव ढवळे बैठकीला होते. प्रत्येकाचे मत समजून घेतले. या सर्वांनी उद्धव ठाकरेंवर निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, असे सांगतानाच द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले.
( हेही वाचा: JEE Main Result 2022: JEE Mains चा निकाल जाहीर; जाणून घ्या टक्केवारीनुसार, कुठे मिळू शकेल प्रवेश )
शिवसेनेत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची परंपरा
यशवंत सिन्हा यूपीएचे उमेदवार आहेत. त्यांनाही सदभावना आहेत. विरोधकांचे ऐक्य टिकले पाहिजे हे खरे असले तरी अशा निवडणुकीत लोकभावना पाहिल्या पाहिजे. यापूर्वी आम्ही प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. एनडीएला दिला नव्हता. प्रणव मुखर्जींनाही एनडीएत असताना पाठिंबा दिला. शिवसेनेत अशा प्रकारचा निर्णय घेण्याची परंपरा आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील. पक्षप्रमुख हे दबावाखाली निर्णय घेत नाहीत, त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक आहे, असे राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community