काँग्रेस-उबाठा गटात महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरु झाली असून जागावाटपावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर तोंडसुख घेत राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली. “राज्यातील काँग्रेसमध्ये असा एकही नेता नाही जो जागावाटपाबाबत निर्णय घेऊ शकेल. त्यांना अधिकारही नाही. त्यांना दिल्लीला विचारावं लागतं,” अशा शब्दात राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
काँग्रेसने ४८ जागा लढावाव्या
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी २५ जागा लढवणार असल्याचा दावा केला. यावर बोलताना राऊत म्हणाले, “काँग्रेसने ४८ जागा लढावाव्या. कारण ही बातमी कोणी दिली मला माहित नाही. पण आम्ही कालच खर्गेसोबत बसलो होतो. उद्धव ठाकरे दिल्लीत आले तेव्हा त्यांनी सोनियाजी मॅडम. राहुलजी गांधी, वेणुगोपालजी, खर्गेजी यांच्यासोबत महाराष्ट्रावर चर्चा झाली आणि जागावाटपाबाबतची चर्चा आणि निर्णय आम्ही दिल्लीत करू. आणि यासंदर्भात फक्त आम्हालाच माहिती आहे,” असा प्रतिदावा राऊत यांनी केला.
(हेही वाचा-Coronavirus JN1 variant : एका दिवसात सहा जणांचा मृत्यू ; कोरोनाची धास्ती वाढली)
राष्ट्रवादी, इतरांना शून्य जागा
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून काँग्रेसने २५ जागांवर आपला हक्क सांगितला असून उबाठा गटाने २३ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला तसेच इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
आमचे दिल्लीत ठरले
“महाराष्ट्रातील नेत्यांना जागावाटपाबाबत माहिती नाही. आणि आम्ही २३ जागा लढणार हे आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे, आमचे संबंध दिल्लीतल्या नेत्यांशी चांगले आहेत,” असे राऊत यांनी आज सांगितले.
आंबेडकर अजून ‘वेटिंग’वरच
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी चर्चा झाली.