आता सेनेचा गोव्यातही मविआसारखा प्रयोग! काय म्हणाले भाजपा नेते?

गोवा आघाडीत सेनेला योग्य स्थान मिळाले. तर त्याठिकाणीही महाविकास आघाडीचा प्रयोग करू शकतो, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. 

62

शिवसेना आता पुन्हा एकदा राज्याची सीमा ओलांडण्याचे धाडस करणार आहे. याआधी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अत्यंत वाईट स्थितीत पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या सेनेने उत्तर प्रदेशात पुन्हा १०० जागा लढवण्याची घोषणा केली, तसेच गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या यासंबंधीच्या वक्तव्याची भाजपच्या नेत्यांनी मात्र खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने पाच वर्षांपासून काम सुरू केले आहे. आम्ही गोवा विधानसभेच्या २०-२१ जागा आम्ही लढविणार आहोत. जर तेथील आघाडीत सेनेला योग्य स्थान मिळाले तर त्याठिकाणीही महाविकास आघाडीचा प्रयोग करू शकतो, तसेच उत्तर प्रदेशातही महाविकास आघाडीचा प्रयोग करू शकतो, असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात आघाडी झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : शिवसेनेचा यू-टर्न! आता किती जागा लढणार?)

शिवसेनेला इज्जत घालवण्याची सवय! – किरीट सोमय्या

उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेनेला याआधी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, त्यांची डिपॉझिट जप्त झाले. तरीही सेनेला तिथे निवडणुका लढवायच्या आहेत. शिवसेनेला स्वतःची इज्जत घालवण्याची सवयच लागली आहे, त्याला आम्ही तरी काय बोलणार, अशा शब्दांत भाजपा नेते डॉ.  किरीट सोमय्या म्हणाले.

विश्वासघाताचा प्रयोग, हा फक्त एकदा करता येतो! – अतुल भातखळकर

गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे, असे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. महाविकासआघाडी सारखा प्रयोग म्हणजे ज्यांच्या बरोबर मिळून निवडणूक लढवली त्यांच्या विश्वासघाताचा प्रयोग, हा फक्त एकदा करता येतो. नंतर कोणी विश्वासच ठेवत नाहीत.  २४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.