केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेची झोड उठवणा-या संजय राऊत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही ठाकरे सरकारची चूक होती, असे धक्कादायक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसंपर्क अभियानानिमित्त नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले राऊत?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे देशमुखांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. पण अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय हा त्यावेळी घाई-घाईत घेण्यात आला. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं ही चूक होती, असे विधान यावेळी संजय राऊत यांनी केले.
(हेही वाचाः “ज्यांचा आदर्शच दाऊद आहे, त्यांना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”)
मी सुद्धा पीडित आहे
ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी देशमुखांच्या घरावर धाडी टाकल्या, ते आम्हाला माहीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सध्याच्या काळात खुळखुळा झाला आहे. ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांकडून कुठल्याही कारवाया होत नाहीत. पण जिथे भाजपची सत्ता नाही, तिथे मात्र सरकारमधील नेत्यांच्या मागे कारवायांचा ससेमिरा लावण्यात येत आहे. मी देखील यामधील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आम्ही वाकणार नाही
भाजपने सध्या सुडाचे राजकारण सुरू केले आहे. पण दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. खोटी प्रकरणे मागे लावून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पण आम्ही अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा प्रश्न तर सोडाच, असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः आमदारांना ‘या’ गुन्ह्याची वाटतेय भीती! सरकारवर आणला दबाव)
Join Our WhatsApp Community