राणे म्हणजे केंद्र सरकार नव्हे, आम्ही मोदी-शहांशी बोलू! संजय राऊतांच्या पलटवार

गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केले? या राणेंच्या विधानाचा समाचार घेताना 'बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे. आमच्या सारख्या सामान्य माणसाला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे', असे संजय राऊत म्हणाले.

123

आम्ही काय करायचे आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचे ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललेच पाहिजे असे नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचेच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असे सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असे नाही. आमच्याकडे काम आहेत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच माध्यमांशी चर्चा केली. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी काय म्हटले मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटले नव्हते का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केले ? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केले. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगले वाटले म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे. भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसे वाटत असेल तर ठिक आहे, तसे जाहीर करावे, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : राणेंच्या वादात अमित शहांची एन्ट्री : सेनेच्या अडचणीत वाढ)

गटारात तोंड बुडवून थुंकण्याला टीका म्हणत नाहीत

टीकांना आम्ही घाबरत नाही. शिवसेना पक्ष टीकांचे स्वागतच करतो. टीका बाळासाहेबांवरही व्हायची. पण आता जे चालले त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. टीकेला कोण विरोध करते? टीका करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. पण टीका करणे आणि बेताल बरळणे यात फरक आहे. सध्या जे चालले आहे त्याला टीका म्हणत नाही. गटारात तोंड बुडवून थुंकण्याला टीका म्हणत नाहीत. असे करणाऱ्यांनी तोंड गटारात बुडते हे आधी लक्षात घ्यावे, असे संजय राऊत म्हणाले. तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचे काम करण्यासाठी केले आहे. इथे महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचे काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणी तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे हे आधी लक्षात घ्या, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

बाळासाहेबांमुळे मुख्यमंत्री बनले! 

गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केले? या राणेंच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. बाळासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. शिवसेनेचे उपकार मानले पाहिजे. आमच्या सारख्या सामान्य माणसाला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर बसवले आहे, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.