वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले आणि भेटले. अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने सर्वांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. परंतु व्यासपीठावर प्रवेश करताच प्रत्येक नेत्यांची भेट घेत अजित पवार यांनी संजय राऊत यांनाही हस्तांदोलन करत आपल्यात काहीच वैर नसल्याचे दाखवून दिले, परंतु राऊत यांनी पवारांकडे न पाहता आपण जणू खूप मोठे नेते असल्याच्या अविर्भावात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
बीकेसीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या वज्रमुठ सभेच्या व्यासपीठावर अजित पवार यांनी प्रवेश केल्यानंतर प्रथम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना हस्तांदोलन केले. त्यानंतर सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ आदींना नमस्कार करत संजय राऊत यांच्यासमोर पोहोचत त्यांच्या हात हाती घेतला. परंतु हे हस्तांदोलन सुरू असताना राऊत यांनी पवारांशी कोणताही संवाद साधला नाही त्यांना साधे स्मितहास्यही दिले नाही. त्यामुळे अजित पवारांना, राऊत यांनी कोणतीही किंमतच दिली नसल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – Barsu Refinery: आता शरद पवारांना का भेटता? उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल)
काही दिवसांमध्ये अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता. राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेसारखा प्रयोग होऊ शकतो, असे म्हणत एकप्रकारे अजित पवारांकडे बोट दाखवले होते.
त्यानंतर पवारांनीही संजय राऊत यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर प्रथमच हे नेते या वज्रमुठ सभेच्या व्यासपीठावर एकत्र आले. परंतु अजित पवार यांनी मनात काहीही न ठेवता राऊतांची भेट घेतली, पण राऊत हे सध्या स्वत: महाविकास आघाडीचे मोठेनेते समजत असून यामुळे त्यांनी पवारांना किंमत देणे टाळले असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांशी साधे बोलणे सोडा, त्यांच्या भेटण्याने हास्यही चेहऱ्यावर त्यांनी दाखवले नाही. उलट पवार भेटत असताना दुसरीकडेच पाहून ते टाळ्या वाजवण्यातच मग्न असल्याचे चित्रात दिसून आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community