राणेंची यात्रा म्हणजे येड्यांची जत्रा… राऊतांची सामनातून ‘रोखठोक’ टीका

राणेंनी आपल्या यात्रेत परंपरेने गोंधळ घातल्याने मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाल्याची टीका रोखठोक मधून करण्यात आली आहे.

121

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा वादग्रस्त ठरत आहे. त्यातच पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नारायण राणे यांना डिवचण्यात आले आहे. सामनातील रोखठोक मधून संजय राऊत यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर जोरदार घणाघात केला आहे. राणेंची ही यात्रा म्हणजे येड्यांची जत्रा झाली आहे, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

भाजपचे घाणेरडे हल्ले

मोदी सरकारमधील अनेक मंत्री जन आशीर्वाद यात्रा करत फिरत आहेत. राज्यातील भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांच्या यात्रा सुरळीतपणे पार पडत आहेत. परंतु राणेंनी आपल्या यात्रेत परंपरेने गोंधळ घातल्याने मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले असल्याचीही टीका रोखठोक मधून करण्यात आली आहे. राज्यातील भाजपला विरोधात बसणे कमीपणाचे वाटत असल्याने ते राज्य सरकारवर घाणेरड्या पद्धतीने हल्ले करत आहेत. स्वतः हल्ले करुन थकल्यानंतर त्यांनी आता राणेंसारख्या बाहेरुन आलेल्यांना हे काम दिल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः राणेंमुळे भाजप दहाफूट मागे जाईल! संजय राऊतांचा इशारा)

राज्याची इभ्रत मातीमोल

गेल्या चार एक दिवसांत राज्यात जे काही घडले त्याने राज्याची इभ्रत मातीमोल झाली आहे. सार्वजनिक जीवनात व्यक्तीने प्रतिष्ठा आणि परंपरा सोडली की काय होते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. राणे आणि त्यांचे चिरंजीव गेली अनेक वर्षे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर असंसदीय भाषेत टीका करत आहेत, त्याची दखल कोणी घेतली नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थोबाडीत मारण्याची भाषा केंद्रीय मंत्री राणे करतात आणि भाजपचे पुढारी हतबलतेने ही नौटंकी पाहत राहतात, असे रोखठोक मतही सामनातून मांडण्यात आले आहे.

दिल्ली पाठीशी का उभी राहते?

राणेंच्या वक्तव्याचे पडसाद उमटले व त्यांना अटक करुन जामीन मिळाला. पण राणेंच्या वर्तणुकीचे समर्थन देवेंद्र फडणवीसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. गृहमंत्री अमित शहा यांनीही राणेंना फोन करुन, ‘हम आपके साथ हैं’ असे सांगितल्याचे समजते. हे जर सत्य असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा अपमान करणा-यांच्या मागे दिल्ली प्रत्येक वेळी का उभी राहते, असा रोखठोक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

(हेही वाचाः …तर तुमच्याही कुंडल्या बाहेर काढू! संजय राऊतांची राणेंना धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.