शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेचा गड भेदण्याची रणनिती मनसेने आखली असून त्यादृष्टीकोनातून मनसेने विभाग प्रमुखांची खांदेपालट केली आहे. मनसेने या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेत असतानाच त्या पार्श्वभूमीवर विभाग अध्यक्ष संजय जामदार यांना बाजूला करून पुन्हा एकदा माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्याकडे या विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वरळीत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमोर एक तगडे आव्हान निर्माण करून या गडावर मनसेचा झेंडा रोवण्याच्या रणनितीचा भाग म्हणूनच हा विभाग अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न मनसेने केला असल्याचे बोलले जात आहे.
सन्मा. राजसाहेबांच्या आदेशाने मुंबईतील वरळी 'विभाग अध्यक्ष'पदी श्री. संतोष धुरी व 'महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेने'च्या 'अध्यक्ष'पदी श्री. सचिन गोळे ह्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/CvyJmBtoeQ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 22, 2023
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे नेते आणि उमेदवार आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाच्या मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने आपला उमेदवार न देता एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक सोपी करून टाकली होती. परंतु आगामी २०२४च्या निवडणुकीत मनसे हे ठाकरे गटाला आणि पर्यायाने आदित्य ठाकरे यांना शह देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. वरळीत मनसेचे संजय जामदार आणि बंटी म्हशीलकर हे पदाधिकारी असून या विधानसभेचे विभाग प्रमुख हे बंटी म्हशीलकर हे आहेत. परंतु या दोघांना या मतदार संघात मजबूत बांधणी करता आलेली नसल्याने आता या विधानसभेच्या बांधणीची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
संतोष धुरी यांची एक वर्षांकरता ही नियुक्ती
वरळी विधानसभा मतदार संघामध्ये भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वजन नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान द्यायचे असल्यास मनसेसाठी याठिकाणी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळेच मनसेने हा मतदार संघ बांधणीची जबाबदारी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सोपवण्याची तयारी केली असून त्यादृष्टीकोनातून देशपांडे यांनी बीडीडी चाळीच्या प्रमुख समस्यांसह विभागातील विविध समस्या जाणून घेत या मतदार संघाचा आढावा घेत बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशपांडे यांच्या शिफारशीनुसार माजी नगरसेवक संतोष धुरी यांना पुन्हा विभाग अध्यक्ष बनवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. २२ एप्रिल रोजी धुरी यांना नियुक्तीचे पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. एक वर्षांकरता ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे.
या विधानसभेची जबाबदारी पूर्वी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्याकडे होती, त्यानंतर या विधानसभेच्या विभाग अध्यक्षपदी संतोष धुरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण नंतर धुरी यांना बाजुला संजय जामदार यांच्याकडे या मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होत. परंतु या मतदार संघाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्याकडे सोपवण्याचा निर्धार मनसेने केल्यानंतर या मतदार संघाच्या विभाग अध्यक्षपदी असलेल्या संजय जामदार यांना बाजुला करून पुन्हा एकदा संतोष धुरी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
(हेही वाचा – शरद पवारांच्या भाकरी फिरवली पाहिजे वक्तव्याचा अर्थ सांगितला नरेश म्हस्केंनी; म्हणाले….)
या मतदार संघात मनसेचा एक व उर्वरित सर्व नगरसेवक तत्कालीन शिवसेनेचे निवडून आले होते. त्यातील मनसेचे दत्ता नरवणकर हे पुढे सेनेत आले होते. परंतु शिवसेनेची दोन छकले पडल्यानंतर ठाकरे सोबत असलेले समाधान सरवणकर, दत्ता नरवणकर, संतोष खरात हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहेत. पण त्यातुलनेत शिवसेनेची स्थिती मजबूत नसून भाजपसाठीही तेवढे अनुकूल वातावरण दिसत नाही.
या माध्यमातून आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून देशपांडे यांना या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकूणच महापालिका व विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी देशपांडे यांच्या नावाचा विचार झाला असल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community