सारंगी महाजनांची राजकारणात होणार एन्ट्री! का आणि कधी? वाचा… 

भाजपामध्ये प्रवेश करण्यास आपल्याला काहीही अडचण नाही, पण भाजपा हा मुंडे आणि महाजन यांचा प्रायव्हेट पक्ष आहे, अशी टीका सारंगी महाजन यांनी केली.

प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन या लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. तशी अधिकृत घोषणा स्वतः सारंगी महाजन यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या ‘ऑफबीट सारंगी महाजन’ या मुलाखतीत केली. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी सारंगी महाजन यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवासामधील अनेक आठवणी बिनधास्तपणे सांगितल्या.

येत्या निवडणुकीच्या आधीच आपण राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र नेमक्या कोणत्या पक्षात आपण जाणार आहोत, हे आता सांगू शकत नाही. त्याची घोषणा आपण करूच. आपल्याकरता सर्व पक्षांची दारे खुली आहेत, अगदी भाजपाचीही! पण भाजपाच्या नेत्यांनी मनमोकळेपणा दाखवणे गरजेचे आहे. मी एखाद्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करून राजकारण करणार आहे, इतकेच यानिमित्ताने सांगत आहे, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.

भाजपा हा मुंडे-महाजनांचा प्रायव्हेट पक्ष!

भाजपामध्ये प्रवेश करण्यास आपल्याला काहीही अडचण नाही, पण भाजपा हा मुंडे आणि महाजन यांचा प्रायव्हेट पक्ष आहे. त्यामुळे तिथे त्यांच्या मर्जीशिवाय दुसऱ्या कुणाला घेतले जात नाही. अगदी नात्यातील लोकांनाही, अशी टीकाही सारंगी महाजन यांनी यावेळी केली.

कोण आहेत सारंगी महाजन?

सारंगी महाजन या प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ठाण्याच्या तुरुंगात प्रमोद महाजन यांच्या हत्येची शिक्षा भोगत असतानाच प्रवीण महाजन यांचा नोव्हेंबर २०१५ रोजी मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here