निस्वार्थता ओळखा, नकली पासून सावध रहा, सरसंघचालकांचे आवाहन

93

देशाच्या सेवेत असलेल्या निस्वार्थांची ओळख पटवून त्यांना साथ दिली पाहिजे. तसेच नकली व्यक्ती आणि संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील सुरेश भट सभागृहात रविवारी आयोजित ‘उत्तिष्ठ भारत’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

… तर आव्हानेच उभी राहणार नाहीत 

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, जर आम्हाला देशासाठी ‘व्हिजन 2047’ निर्धारित करायचे असले तर त्यासाठी जोश आणि होश दोन्ही आवश्यक आहे. समाजात व्यक्तिच्या प्रगतीसाठी खूप परिश्रमांची गरज पडते तर देशाच्या विकासासाठी त्याहून अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. आमचे “व्हिजन आणि एक्शन” अर्थात ध्येय आणि कृती यात सुस्पष्टता असली पाहिजे. भारताला जगाचे दोहन करून स्वतः समृद्ध बनणारा अमेरिका किंवा साम्राज्यवादी चीन बनायचे नाही. भारताला त्याच्या अस्तित्वाचा खरा कार्यकारण भाव माहिती आहे. संकट काळात आपल्या देशातील लोक एकमेकांच्या मदतीसाठी तयार असतात. कोरोना काळात जगाने याचा अनुभव घेतलाय. परंतु, जर आपण सदैव तयार असलो तर आव्हानेच उभी राहणार नाहीत असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानावरून Twitter वॉर! उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर)

भारतीय इतिहास 2400 वर्ष जुना असल्याचे देशातील इतिहासकार मानतात. परंतु, हे सत्य नसून आमचा इतिहास त्याही पूर्वी अनेक वर्ष जुना आहे. आम्हाला आमचा मूळ आणि खरा इतिहास शोधावा लागेल. त्यासाठी परिश्रमांची गरज आहे. भारत एखादी लढाई हरला असेल पण आम्ही युद्धात कधीच पराभूत झालो नाही. परंतु, आत्मविस्मरणात आम्हाला स्वतःचा विसर पडला. त्यामुळेच आम्ही समाजात भेद-भावाच्या भिंती उभारल्यात. माणसांचे छोटे अहंकार मोठे झालेत. भारतावर आक्रमण करणाऱ्यांनी याचा फायदा घेत आमच्या आत्मविस्मृत आणि अहंकारयुक्त समाजाला विभक्त करण्याचे काम केले. आमच्यात क्षमा आणि हिंसा दोन्हीची क्षमता आहे.

भारत हा अहिंसेचा उपासक दुर्बलतेचा नाही

भारत हा अहिंसेचा उपासक आहे दुर्बलतेचा नाही असे सरसंघचालकांनी यावेळी स्पष्ट केले. उपस्थित तरुणाईला आवाहन करताना सरसंघचालकांनी सांगितले की, आजघडीला जगाला मार्ग दाखवणे, देशाला एकात्म, बलवान व विश्वगुरू बनवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या लोकांना साथ देण्याची गरज आहे. असे काम करणाऱ्यांपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला ठाऊक आहे. परंतु, देशात संघासोबतच इतरही अनेक जण आहेत. निस्पृहता आणि प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख आहे. कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेची निवड करण्यापूर्वी तावून-सुलाखून पाहण्यची आवश्यकता आहे अन्यथा ठेचाळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नकली मालापासून सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.

तरच देशाला आपले लक्ष्य गाठता येईल

आमच्या देशाच्या उणिवा दाखवणारे बरेच लोक आहेत. अशा लोकांच्या हातात मायक्रोफोन असल्यामुळे त्यांचे बोलणे अधिक प्रकर्षाने जाणवते. परंतु, त्याच्या नकारात्मक प्रचाराच्या 40 टक्के अधीक चांगले काम करणारे लोक आमच्या देशात आहेत. आम्हाला आमच्यातील प्रात, भाषा, जाती, पंथ, संप्रदाय, धर्म आणि सांस्कृतिक भेदांना विसरून या देशाचा स्वभाव लक्षात घेण्याची गरज आहे. या देशाच्या स्वभावानुसार आम्हाला आमचा स्वभाव बनवावा लागेल. व्यक्ती आणि देशाचा स्वभाव सारखा झाला तरच देशाला आपले लक्ष्य गाठता येईल, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.