नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सतीश उके यांच्या नागपूर इथल्या घरी सकाळपासून तपास यंत्रणांनी झाडाझडती सुरु केली. आता चौकशीसाठी उकेंना ताब्यात घेण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वकील सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती. त्यावेळी ते बरेच चर्चेत आले होते.
भाजप नेत्यांविरोधात याचिका
नागपुरातील सुप्रसिद्ध वकील म्हणून ओळख असणा-या सतीश उके यांना 2018 मध्ये जमीनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोप करणारी याचिका दाखल केल्याने ते चर्चेत आले होते. फडणवीसच नाहीत तर अनेक भाजप नेत्यांविरोधात त्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. आता सध्या ते नाना पटोलेंची नितीन गडकरी यांच्या विरोधातल्या केसचे सुद्धा वकील आहेत. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे.
( हेही वाचा: ‘फूलराणी’ च्या शोधात मुंबईचे रस्ते )
मोदी नावाच्या गावगुंडालाही समोर आणले होते
देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला होता. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. इतकेच नाही तर, नाना पटोले यांनी ज्या मोदी नावाच्या गुंडाबाबत सांगितले होते. त्यालाही याच सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.