नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अखेर गुरुवारी, १९ जानेवारीला काँग्रेसने सत्यजित तांबेंचे निलंबन करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून दिली. या परिषदेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.
गुरुवारी पार पडलेल्या मविआच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, ‘आम्हाला तांबे कुटुंबियांसोबत काय झाले, यासंदर्भात काही भाष्य करायचे नाही. आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. बाळासाहेब थोरात साहेब आमचे नेते असून ते सध्या रुग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्याशी नंतर चर्चा करू आणि त्यांची भूमिका काय आहे हे पाहू. पण सध्या सत्यजित तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.’
नक्की काय घडले होते?
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सुधीर तांबेंकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. पण तरीही सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि दुसरीकडे त्यांचे सुपुत्र म्हणजेच सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
मविआचे ५ मतदारसंघातील उमेदवार कोणते?
- नाशिक पदवीधर मतदारसंघ – शुभांगी पाटील
- अमरावती पदवीधर मतदारसंघ – धिरज लिंगाडे
- नागपूर शिक्षक मतदारसंघ- सुधाकर अडबाले
- कोकण शिक्षक मतदारसंघ- बाळाराम पाटील
- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – विक्रम काळे
(हेही वाचा – Kolhapur Politics: सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा काँग्रेसला रामराम)