स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना चौफेर टीका सहन करावी लागत आहे. भाजपा-शिवसेनेने राहुल यांना लक्ष्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटानेही विरोधाचा सुरू आळवला आहे. त्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दांत निषेध करीत, ‘सावरकरांनी माफी मागितली याचे पुरावे दाखवा,’ असे आव्हान दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रणजित सावरकर म्हणाले की, राहुल गांधी सांगत आहेत की, ते सावरकर नाहीत म्हणून माफी मागणार नाहीत. वीर सावरकरांनी माफी मागितलेली कागदपत्रे दाखवण्याचे मी त्यांना आव्हान देतो. उलट त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दोनदा माफी मागितली आहे. राहुल गांधी जे काही बोलत आहेत, ती बालिशपणाची वक्तव्ये आहेत. देशभक्तांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे निषेधार्ह आहे.
राज्यभरात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढली जाणार असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
- भाजपा-शिवसेना युतीचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी होतील. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यभरात ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ला सुरुवात होईल, अशी माहिती मिळत आहे.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्याला गौरव यात्रेत उजाळा दिला जाईल.
- ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या माध्यमातून सावरकरांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच राहुल गांधी यांचा निषेधही केला जाणार आहे. सावरकरांनी कितीतरी क्षेत्रात योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढली जाणार अल्सल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
(हेही वाचा – ‘आम्ही सारे सावरकर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘डीपी’ पाहिलात का?)
Join Our WhatsApp Community