सत्ता गेल्यापासून राहुल गांधींकडून वीर सावरकरांवर खोटे आरोप – रणजित सावरकर

101

काँग्रेसची सत्ता गेल्यापासून राहुल गांधींकडून वीर सावरकरांवर खोटे आरोप केले जात आहेत, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी डी. डी. न्यूज या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केले आहे.

सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात रणजित सावरकर यांनी सांगितले की, इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचा सन्मान केला. त्यानंतर जे काँग्रेसचे सरकार आले त्यांनी वीर सावरकरांचा सन्मान केला नाही, पण अपमानही केला नाही. कॉंग्रेसचे अनेक तत्कालीन मंत्री होते, जे व्यक्तिगत वीर सावरकरांचा सन्मान करत होते. पण १९९९ साली वाजपेयी सरकार आले आणि काँग्रेसचे सरकार गेले तेव्हा पहिल्यांदा सावरकरांवर आरोप करणे सुरू झाले. त्यानंतर २००४मध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आले तेव्हापासून ते २०१४पर्यंत सावरकरांवर कोणतेही आरोप झाले नाहीत. परंतु जेव्हा पुन्हा २०१४मध्ये काँग्रेसची सत्ता गेली, तेव्हापासून वीर सावरकरांवर आरोप करणे सुरू झाले. हिंदुत्वाचे प्रणेते वीर सावरकर आहेत आणि भाजपचे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार समजले जाते. त्यामुळे हिंदुत्वावर प्रहार केला तर सत्तेत पुन्हा येता येईल असे राहुल गांधींना वाटत असावे, असे मला वाटते. या शिवाय वीर सावरकरांवर आरोप करण्याचे दुसरे काही कारण नसल्याचे रणजित सावरकर म्हणाले.

जिथे निवडणूक असते, तिथे राहुल गांधी राजकीय फायद्यासाठी असे करतात. आज लोकांसमोर खरा इतिहास येत आहे. जर तुम्ही देशभक्तांचा अपमान करत असाल तर जनतेच्या मनात द्वेष निर्माण होणारच. परंतु राहुल गांधी विशिष्ट वर्गासाठी मतांचे विकेंद्रीकरण करू इच्छित आहेत. निवडणुकीत मतांच्या ध्रुवीकरणांसाठी राहुल गांधींकडून वीर सावरकरांवर खोटे आरोप केले जात आहेत.

राहुल गांधींना आव्हान

वीर सावरकरांनी कधी माफी मागितली नाही. त्यांनी कायदेशीर पद्धतीने याचिका दाखल केली होती. त्यांनी जे लिहिले त्याला कायदेशीर भाषेत मर्सी पिटीशन म्हणतात. ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ब्रिटीश काळातील गृहमंत्री रेजिनाल्ड क्रेडॉक म्हणतात की, वीर सावरकारांना कोणताही खेद किंवा खंत नव्हती. त्यांनी कुठेही माफी मागितली नाही. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही आमच्याशी जे वर्तन केले आहे, त्यामुळे आम्हाला शस्त्र हाती घ्यावे लागले आहे. दुसऱ्या देशात राजकीय कैद्यांना चांगली वागणूक दिली जाते. तुम्ही आम्हाला कोलू चालवण्याची जबरदस्ती करत आहात. तुम्ही सर्व क्रांतिकारकांना सोडा, मला सोडू नका तर इतर कैद्यांना सोडा. यात वीर सावरकरांनी कुठेही माफी मागितलेली नाही. त्यामुळे वीर सावरकरांनी माफी मागितलेली कागदपत्रे राहुल गांधींनी दाखवावीत, असे आव्हान रणजित सावरकर यांनी यावेळी दिले.

(हेही वाचा – ‘आम्ही सारे सावरकर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘डीपी’ पाहिलात का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.