Sawantwadi Assembly : तेलींच्या प्रवेशामुळे परबांचा पत्ता कट?

174
Sawantwadi Assembly : तेलींच्या प्रवेशामुळे परबांचा पत्ता कट?
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वर्तणुकीला कंटाळून भाजपाचे राजन तेली यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सावंतवाडी विधानसभेत केसरकर यांच्यापुढे आता उबाठा शिवसेनेचेच आव्हान राहणार आहे. केसरकर यांना शह देण्यासाठी उबाठा शिवसेनेने राजन तेली यांना पक्षात प्रवेश दिला असला तरी प्रत्यक्षात मागील पाच वर्षांपासून उबाठा शिवसेनेची ताकद या मतदार संघात वाढवणारे शैलेश परब यांच्यावर मात्र अंधेरीपाठोपाठ कोकणातही पक्षाकडून अन्याय होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अंधेरीत रविंद्र वायकर यांच्याशी पटत नसल्याने सावंतवाडीची जबाबदारी सोपवलेल्या शैलेश परब यांना आता तेलींच्या प्रवेशामुळे निवडणूक लढवण्याच्या मार्गात मोठा बांध तयार झाला. (Sawantwadi Assembly)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सावंतवाडी विधानसभेतून सलग तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले आहे. सन २००९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आणि सन २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवत निवडून आले होते. परंतु केसरकर हे आता एकनाथ शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेत असल्याने या शिवसेना भाजपाच्या युतीमुळे भाजपाचे सावंतवाडीची बांधणी करणारे राजन तेली यांना तिकीट मिळण्याचा मार्ग बंद झाला होता. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती असूनही राजन तेली यांनी केसरकर यांच्यासमोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. मागील निवडणुकीत केसरकर यांना ६८ हजार ७८४ मते मिळाली होती, अपक्ष राजन तेली यांना ५६ हजार ५५६ एवढे मतदान झाले होते. अपक्ष निवडणूक लढवूनही तेली यांना १३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, कपाट ऐवजी कमळ चिन्ह असते तर केसरकर यांचा पराभव निश्चित होता. (Sawantwadi Assembly)

(हेही वाचा – भाजपाच्या राष्ट्रीय सचिव Vijaya Rahatkar यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी केसरकर यांनी प्रयत्न केले आणि त्याचमुळे या मतदारसंघात राणे यांना मताधिक्य मिळाले होते. केसरकर यांनी राणे यांच्याशी जुळवून घेतल्यामुळे तसेच शिवसेना भाजपा युतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाणार असल्याने विद्यमान आमदार केसरकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाचे राजन तेली यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने अखेर त्यांनी पक्षाला रामराम करत उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. भाजपाने आपल्याला खूप काही दिले, परंतु केसरकर यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे तेली यांनी सांगत प्रवेश केला. (Sawantwadi Assembly)

त्यामुळे मातोश्रीवर तेली यांचा प्रवेश झाला असल्याने सावंतवाडी विधानसभेतील उबाठा शिवसेचेने संभाव्य उमेदवार म्हणून राजन तेली यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मागील निवडणुकीपासून शिवसेनेची बांधणी या मतदार संघात करतानाच केसरकर सोडून गेल्यानंतरही उबाठा शिवसेनेचे काम निष्ठेने करणाऱ्या माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या उमेदवारीवर काट मारली जाण्याची शक्यता आहे. शैलेश परब यांनी या विधानसभेत उबाठा शिवसेनेची बांधणी मजबूत करत असतानाच तेली हे केवळ उमेदवारीसाठी पक्षात आल्याने एकप्रकारची नाराजीही शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत आहे. (Sawantwadi Assembly)

(हेही वाचा – Sharad Pawar मराठा आरक्षणासाठी जबाबदार; खासदार उदयनराजे भोसले यांचा आरोप)

सावंतवाडी विधानसभेतून उबाठा शिवसेनेकडून शैलेश परब तसेच तालुका प्रमुख रुपेश राऊत हे इच्छुकांच्या रांगेत होते तर भाजपाकडून राजन तेली, संजू परब आणि भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आदी इच्छुकांच्या रांगेत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बबन साळगावकर आदी इच्छुकांच्या रांगेत आहेत. त्यामुळे आता सावंतवाडीमध्ये शिवसेना विरुध्द उबाठा शिवसेना अशीच लढत पहायला मिळणार असून भाजपाच्या नाराजीचा फटका भविष्यात त्यांना बसेल आणि याचा फायदा उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला होईल असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. (Sawantwadi Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.