राज्यातील नाट्यगृहांची आसनक्षमता आता ४०० ते ९०० इतकी होणार आहे. त्यासाठी नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्यावतीकरण करताना राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिल्या.
राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नाट्यनिर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा ‘भारत जोडो’मध्ये सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्यात सहकार्य करू; काँग्रेसचा ‘उद्धवसेने’ला प्रस्ताव)
प्रत्येक नाट्यगृहांसाठी ४ कोटी ते १० कोटी रुपयांची आवश्यकता
मुनगंटीवार म्हणाले की, सर्व नाट्यगृहांसाठी ‘टाईप प्लॅन’ तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे ४००, ६००, ८०० आणि ९०० आसन क्षमतेसाठी आवश्यकता असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाट्यगृहांसाठी ४ कोटी ते १० कोटी रुपयांची आवश्यकता असून, हा निधी कसा देता येईल, याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
१० वर्षांत आधुनिकीकरण
राज्यात सध्या एकूण ८३ नाट्यगृहे आहेत. यापैकी खाजगी २८, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित ५१ आणि राज्य शासनाची ४ नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे पुढील १० वर्षांत आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाट्यगृहाचे नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community