यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल दाखवण्यात आले होते. त्यावेळी शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली, मात्र मतमोजणीच्या दिवशी निकाल अनुकूल नसल्याने बाजार कोसळला. विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने याला हेराफेरी म्हटले होते. मात्र, बाजार नियामक सेबीने (SEBI) हा आरोप फेटाळून लावला.
विरोधी पक्षांच्या आरोपांवर, बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने तपास सुरू केला होता. सेबीने आता हा तपास पूर्ण केला आहे. सेबीचे म्हणणे आहे की लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या दिवशी मार्केटमध्ये कोणताही फेरफार किंवा इनसाइडर ट्रेडिंग झाली नाही. बाजारातील सर्व पायाभूत सुविधांकडून डेटा मागवण्यात आला. त्यांच्या सखोल विश्लेषणात कोणतीही अनियमितता आढळली नाही.
राहुल गांधींनी चौकशीचा आदेश दिलेला
एक्झिट पोलच्या सरासरी अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) जवळपास 367 जागा मिळतील असे सांगण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जून रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. मात्र, 4 जून रोजी मतमोजणीच्या दिवशी एनडीएला अवघ्या 293 जागा मिळाल्या. यानंतर बाजार 6 टक्क्यांनी घसरला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बाजारातील हेराफेरीचा आरोप केला होता. शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले होते आणि संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी केली होती. राहुल गांधींनंतर टीएमसीचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी सेबीला (SEBI) पत्र लिहून असाच आरोप केला होता.
(हेही वाचा Assam मध्ये मुस्लिम विवाहासाठी येणार नवीन कायदा; कोण-कोणत्या गोष्टींवर येणार प्रतिबंध?)
त्यांच्या पत्रात गोखले यांनी लिहिले होते की, “एक्झिट पोल कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना एक्झिट पोलच्या प्रसारणापूर्वी प्रगत माहिती पुरवली, ज्यामुळे त्यांना गैर-सार्वजनिक माहितीद्वारे स्टॉक मार्केटमध्ये अन्यायकारक आणि अंतर्गत फायदे मिळतात.” याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर सेबीने (SEBI) त्याची चौकशी सुरू केली.