अधिवेशन सोडून शिवसेना खासदार गेले कुणीकडे?

138

१४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून आता दुसरा आठवडा सुरू आहे. परंतु, शिवसेनेचे बहुसंख्य खासदार सभागृहातून गैरहजर असल्याचे निदर्शनास येत आहे. तर दूसरीकडे दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच शिवसेनेचे जवळपास सर्व खासदार शिवसंपर्क अभियानात व्यस्त देखील असल्याचे दिसतेय. यावरून विरोधकांमध्ये एकच चर्चा सुरू असून अधिवेशन सुरू असताना ते सोडून शिवसेना खासदार वेगळ्याच मिशनवर आहेत का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात काही वेगळं सुरू आहे?, अशा चर्चाना एकच उधाण आले आहे.

सेनेचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी खासदारांवर

विदर्भ व मराठवाडा यासारख्या प्रदेशांमध्ये शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासदारांवर त्याची जबाबदारी टाकली आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यात सेनेचे खासदार सध्या महाराष्ट्रातच फिरत आहेत. सेना खासदार कृपाल तुमाने (रामटेक) यांनी केवळ सोमवारी हजेरी लावून नागपूर गाठले. सेनेच्या राज्यसभेतील सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या चर्चेत भाग घेतला. तर शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेच केवळ सध्या दिल्लीत असून इतर जवळपास सर्व जण पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या मिशनमध्ये गुंतलेले असल्याचे वृत्त आहे.

(हेही वाचा – कोळी बांधवांच्या विरोधामुळे धारावीतील पंपिंग स्टेशनची जागा बदलली)

२५ मार्चपर्यंत चालणार ‘शिव संपर्क अभियान

शिवसेनेच्या ‘शिव संपर्क अभियाना’ला मंगळवारी २२ मार्चपासून सुरुवात झाली असून शिवसेनेचे हे अभियान २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण १९ जिल्ह्यात असणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार ‘शिव संपर्क अभियान’ सुरू करणार आहेत. राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी, शिवसेनेने ‘शिव संपर्क अभियान’ सुरू केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.