दुसरी लाट, पण प्रशासनाला का नको नगरसेवकांची मदत?

जनतेशी थेट संपर्कात असणारा हा नगरसेवक असून त्यांची मदत घेतल्यास प्रशासनाला उपाययोजना राबवताना मोठी मदत होती. परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा नगरसेवकांना विश्वासात न घेताच काम करण्यास सुरुवात केल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येची समस्या जटील होताना दिसत आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर महापालिका प्रशासन आपल्या स्तरावरच सर्व उपाययोजना राबवत आहे. मात्र, पहिल्या लाटेमध्ये सुरुवातीला अशाचप्रकारे नगरसेवकांना दूर ठेवणाऱ्या प्रशासनाने मग त्यांची मदत घेतच हा आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासन अद्यापही नगरसेवकांची मदत घेताना दिसत नसून त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. जनतेशी थेट संपर्कात असणारा हा नगरसेवक असून त्यांची मदत घेतल्यास प्रशासनाला उपाययोजना राबवताना मोठी मदत होती. परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा नगरसेवकांना विश्वासात न घेताच काम करण्यास सुरुवात केल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येची समस्या जटील होताना दिसत आहे.

यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाचे अधिकारी नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. पुर्वी रुग्ण आढळला तरी त्याची यादी पाठवली जायची. पण आता ती सुध्दा पाठवली जात नाही. त्यामुळे विभागात जे सॅनिटाईज किंवा अन्न मदत पुरवता येत होती, ती वेळीच करता येत नाही. महापालिकेचे कर्मचारी आठ दिवसांनी बाधित रुग्णांच्या घरी पोहोचतात आणि सॅनिटाईज करतात व त्यांना क्वारंटाईनच्या सूचना करतात. पण त्याचा राग जनता मग आम्हा नगरसेवकांवर काढते. प्रशासनाचे अधिकारीही हतबल असल्याने मी स्वत: १०० खाटांचे कोविड सेंटर मालाडला गोशाळेजवळ निर्माण करत आहे. जर प्रशासन आम्हाला विचारत नसेल, पण जनतेसाठी आम्ही त्यांना महापालिकेच्या भरवंशावर नाही ना सोडणार.
– दक्षा शहा, भाजप नगरसेविका, मालाड

पहिल्या लाटेत अधिकारी, नगरसेवक एकत्र काम करत होते!

मुंबईत दरदिवशी सरासरी ९ ते १० हजार रुग्णांची वाढ मार्च महिन्यापासून होत आहे. मात्र, तेव्हापासून वाढणारा आकडा दहा हजारांच्या आत नियंत्रित असला तरी अनेक रुग्णांना रुग्णखाटा न मिळणे ही समस्या अजूनही कायमच आहे. ७५ ते ८० टक्के रुग्ण हे घरीच राहून उपचार घेत असले तरीही खाटांची समस्या कायम असून यामुळे वेळीच ऑक्सिजन आणि आययीयू बेड उपलब्ध न मिळाल्याने रुग्ण जीव सोडत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यांमध्ये सुरु झालेली ही परिस्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत कायम होती. रुग्णसंख्या अधिक नसली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. परंतु त्यावेळेला प्रशासनाच्या मदतीला नगरसेवकही धावून गेले होते आणि प्रशासनातील अधिकारी व नगरसेवक हे हातात हात घालून कोविड निवारणासाठी काम करत होते. त्याचा चांगला निकाल पाहायला मिळाला आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत ही रुग्णसंख्या कमी झाली होती.

प्रशासन हे नगरसेवकांना विश्वासातच घेत नाही. विभागातील अगदी तळाच्या घटकापर्यंत काय चाललेले असते हे नगरसेवकांना माहित असते. पण नगरसेवकांना प्रशासन कधीच विचारात घेत नाही. नगरसेवकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांपेक्षा जास्त कळते अशातला भाग नाही. पण जे काम नगरसेवक नागरीकांपर्यंत पोहोचून करू शकते ते प्रशासनातील अधिकारी करू शकत नाही. त्यामुळे नगरसेवकांना विश्वासात न घेण्यामुळे आणि एकहाती कारभार हाकलला जात असल्याने आज ही परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.
– रुक्साना सिद्दीकी, नगरसेविका समाजवादी पक्ष, गोवंडी

दुसऱ्या लाटेत अधिकारी एकहातीच कारभार चालवतात!

पण मार्चपासून कोरेानाची दुसरी लाट सुरु झाली असून सध्या मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. परंतु प्रशासनाचे अधिकारी एकहातीच कारभार चालवत असून नगरसेवकांचा त्यामध्ये कोणाताही सहभाग नोंदवून घेतला जात नाही. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आणि नगरसेवक हे आपापल्या परीने प्रयत्न करत असले तरी ते हा आजार नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे नगरसेवकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील अधिकारी आपल्याला रुग्णांची माहितीच देत नाहीअ परिणामी त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि उपाययोजना राबवणेच कठिण होते. तसेच नगरसेवकांच्याा कोणत्याही सूचना प्रशासन ऐकून घेत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या एकहाती कारभारात नगरसेवकांची लूडबूड नको म्हणून त्यांना अधिकारी बाजुला ठेवतात का प्रश्न उपस्थित होत आहे.

पुन्हा एकदा रुग्णांना बेड मिळवून द्या, ऑक्सिजन मिळवून द्या, रेमडेसीविर द्या अशी मारामारी सुरु झाली. महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे ढासळली गेली आहे. त्यांच्याहाती आता काहीच राहिलेले नाही. आमच्याच कार्यकर्त्यांचा मामा दोन दिवस रुग्णवाहिकेतच दिवस काढत होता. त्यांना व्हेंटीलेटर मिळाला नाही. आमचे नगरसेवकांचे सोडा, महापालिका किमान पोलिसांना तरी विश्वासात घेवून काम करते का हा प्रश्न आहे. त्यामुळे जर त्यांना ही परिस्थिती हाताळता येत नसेल तर या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे,असे मला वाटते.
– अनिष मकवानी, भाजप नगरसेवक, जुहू विलेपार्ले

सध्या रुग्णखाटा, रेमडेसीविर इंजेक्शन आदींची समस्या आहे. पण प्रशासनाला आपण पहिल्या लाटेत जशी मदत करत होतो, तशीच करत आहोत. प्रशासनाकडूनही आपल्या विभागातील नगरसेवकांना सहकार्य मिळत आहे.
– रमाकांत रहाटे, नगरसेवक,शिवसेना, काळाचौकी

 

कोविडवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन उत्तमपणे काम करत आहे. पण यासाठी नागरीकांचेही सहकार्य आवश्यक आहे. मागील मार्च महिन्यांमध्ये शिस्त पाळणारे आता या मार्च एप्रिलमध्ये तेवढी काळजी घेताना व शिस्त पाळताना दिसत नाही. प्रशासनातील अधिकारी विचारत नाही म्हणून नगरसेवकांनी नाराज न होता आपल्या विभागात जे जे शक्य आहे ते ते काम करावे. आपला विभाग, आपली जबाबदारी याच भावनेने प्रशासनाबाबत कोणतेही मतप्रवाह न ठेवता आपल्या कोविडला हद्दपार करायचे आहे याच भावनेने काम करायला हवे. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी सहकार्य न करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्याबाबत आयुक्तांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी, पण आपले कार्य थांबवू नये.
– प्रविण मोरजकर, माजी आरोग्य समिती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here