फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा, काँग्रेसमध्येही होणार बंडाळी?

173

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता राज्यात एक नवीन राजकीय वादळ येणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधील काही नेते शिंदे गटात सहभागी होण्याची चर्चा असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

चव्हाण-फडणवीस भेट

एकीकडे भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी सुरू असतानाच फडणवीस आणि चव्हाण यांच्यात ही गुप्त भेट झाल्याची माहिती मिळत आहे. एका खासगी ठिकाणी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांनी ही नाराजी देखील उघडपणे व्यक्त केली होती.

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून काँग्रेसमधील काही आमदार आणि नेते हे भाजप आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसमधल्या या हालचाली नेमकं काय सूचित करतात, याचा तर्क लावण्यात येत आहे.

(हेही वाचाः काँग्रेसमध्येही होणार फाटाफूट? नाराज नेते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता)

काँग्रेसचा गट शिंदे गटात?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही उघड झाली होती. त्यामुळे काँग्रेसमधील नाराजांचा हा गट फूटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटात सामील होऊ शकतो, अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.