केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना विरोधात आलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या हालचाली लक्षात घेऊन मुंबई पोलिसांकडून शिवसेना भवनाची सुरक्षा वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मात्र अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पोलीस यंत्रणा मात्र सतर्क झालेली असल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा : देशाच्या विरोधातील कुठलेही षडयंत्र सहन करणार नाही; अमेरिकन उद्योगपतीच्या टीकेवर स्मृती ईराणींचे प्रत्युत्तर)
शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी फूट पडून दोन गट निर्माण झाले होते, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वतंत्र गट तयार झाले होते. या दोन्ही गटांनी शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा ठोकल्यामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे दिली होती. ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ कुठल्या गटाला मिळावे यासाठी हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी आपला निकाल देत बाळासाहेबांची शिवसेना असलेला पक्षच खरी शिवसेना असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील एकनाथ शिंदेंना देण्यात आले असा निकाल दिला आहे.
आयोगाच्या निकालानंतर खरी शिवसेना ठरलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना भावनांचा ताबा शिंदे गटाकडून हालचाली देखील सुरु असल्याचे विश्वसनीयसूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व राजकीय घडामोडी नंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून शिवसेना भवन तसेच महत्वाच्या शिवसेना शाखा येथील सुरक्षा वाढविण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे यांच्याकडे शिवसेना भवन येईल आणि ते ताब्यात घेतील, शिवसेना भवन अधिकृतपणे शिंदे गटालाच मिळेल असा दावा रवी राणा यांनी केला होता, त्यामुळे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ खरी ‘शिवसेना’ असल्याचा शिक्कामोर्तब केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्यामुळे शिवसेना भवन शिंदे गटाकडून ताब्यात घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community