असंतोषामुळे काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर? ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची खदखद

101

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज असल्यामुळे ते कधीही शिवबंधन तोडतील, असे बोलले जात आहे. पण दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या नाराजीच्या वावटळीचं आता वादळात रुपांतर झाल्याचे बोलले जात आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी याबाबतची खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत कलह असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता काँग्रेसमधील असंतोषही आता पुन्हा एखदा उफाळून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे समजत असतानाच, आता त्याचा उद्रेक पुन्हा एकदा होत आहे. जुन्या-जाणत्या नेत्यांची काँग्रेसला कदर नसल्यामुळेच काँग्रेसचे मोठे नुकसान होत असल्याचे अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एकनाथ शिंदे पुनरावृत्ती करणार? शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ)

काँग्रेसकडे एकंही महत्वाचं पद नाही

दिल्लीतील किंवा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेपासून विधानसभेपर्यंत पक्षाला उपयोगी होणा-या नेत्यांना तिकीटापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसकडे सध्या महाराष्ट्रातलं कुठलंही महत्वाचं पद नाही. विधानसभेचं अध्यक्षपद आणि विधान परिषदेचं उपसभापती पद सुद्धा काँग्रेस गमावून बसली आहे, अशी खंत अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

…तर राज्यसभेतही काँग्रेसचा पराभव झाला असता

इतकंच नाही तर सातत्याने काँग्रेसकडून बाहेरच्या उमेदवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येत आहे. यामुळे राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील वरिष्ठ नेत्यांना सोडून उत्तर प्रदेशातून आलेल्या इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. जर राज्यसभा निवडणुकीचं मतदान हे गुप्तपद्धतीने झालं असतं तर प्रतापगढी धो-धो मतांनी पडले असते आणि काँग्रेसवर राज्यसभेतही पराभवाची नामुष्की ओढवली असती, असा धक्कादायक खुलासाही अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

(हेही वाचाः एकनाथ शिंदे देणार मंत्रिपदाचा राजीनामा?)

जुन्या-जाणत्यांना बाजूला केले

महाराष्ट्रासह देशभरातील चार महत्वाच्या राज्यांत काँग्रेसने निवडलेले प्रदेशाध्यक्ष हे दुस-या पक्षांतून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील जुन्या-जाणत्या अनुभवी लोकांना डावलवण्यात येत आहे. विधान परिषदेत आमदार असताना माझ्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भाजपला हादरवून सोडले. त्यामुळे अशा नेत्यांना आता काँग्रेसकडून बाजूला केले जात आहे. त्यामुळे जुन्या-जाणत्यांच्या नाराजीचा पक्षश्रेष्ठींना वेळीच विचार करावा, अशी मागणी अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.