देशभरात एकीकडे काँग्रेसची पडझड सुरू असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीला वरिष्ठ नेत्यांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. एक माजी मुख्यमंत्री आणि दोन विद्यमान आमदार या बैठकीला गैरहजर होते.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थितीत होते.
मात्र, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख आणि आमदार संग्राम थोपटे गैरहजर होते. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव मांडताना हे नेते अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विचारणा केली असता, अमित देशमुख परदेशात आहेत. संग्राम थोपटे यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाहीत; तर सुशील कुमार शिंदे यांनी बैठकीला न येण्यासंदर्भात कळवले होते, अशी सारवासारव त्यांनी केली. परंतु, काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला या नेत्यांनी दांडी मारल्यामुळे संमत झालेल्या ठरावांपेक्षा अनुपस्थितीचीच चर्चा अधिक रंगली.
Join Our WhatsApp Community