परबांमुळे जुने-जाणते शिवसैनिक ‘मातोश्री’ला झाले ‘पोरके’?

अनिल परब यांच्या मातोश्रीवरील वाढलेल्या दबदब्यामुळे 'मातोश्री'वर आता आपल्याला पूर्वीचे स्थान मिळत नसल्याचा काही आजी-माजी शिवसैनिकांचा सूर आहे. त्यामुळे शिवसैनिकांचे हक्काचे ठिकाण असलेली ‘मातोश्री’ आपल्याला पोरकी झाल्याची भावना, हाडाच्या शिवसैनिकांच्या मनात आहे.

142

अनिल परब… ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री, शिवसेना आणि खासकरून मातोश्रीच्या कायम मर्जीत असणारे नेते. मातोश्रीवरील त्यांच्या सततच्या वावरामुळे विरोधक आता त्यांचा ‘परिवार’मंत्री म्हणून देखील उल्लेख करू लागले आहेत. मात्र, सध्या हेच अनिल परब चर्चेत आहेत. ते म्हणजे सचिन वाझे प्रकरणामुळे. विरोधकांनी त्यांच्यावर थेट खंडणीचा आरोप केला आणि थेट बोटे वळली ती मातोश्रीकडे. मात्र याच अनिल परब यांच्यावर सध्या होणाऱ्या आरोपांमुळे शिवसेनेतील एक गट खुश असून, जे होते ते चांगल्यासाठीच होते असेच या गटाचे म्हणणे आहे.

तसेच याच अनिल परब यांच्या मातोश्रीवरील वाढलेल्या दबदब्यामुळे ‘मातोश्री’वर आता आपल्याला पूर्वीचे स्थान मिळत नसल्याचा काही आजी-माजी शिवसैनिकांचा सूर आहे. मातोश्रीवर आणि विशेषतः वर्षावर काही ठराविक नेत्यांचे सल्ले ऐकले जातात, त्यापेक्षा आम्ही तिथे न जाणेच पसंत करतो, असे शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी खाजगीत बोलताना सांगितले. त्यांच्या बोलण्यातून अनिल परब यांच्यावर असलेला त्यांचा रोष स्पष्टपणे जाणवत होता. एका माजी मंत्र्याने तर, सध्या जे शिवसेनेत सुरू आहे ते न पटणारे असून, तिकडे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाला काडीचीही किंमत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसैनिकांचे हक्काचे ठिकाण असलेली ‘मातोश्री’ आपल्याला पोरकी झाल्याची भावना, हाडाच्या शिवसैनिकांच्या मनात आहे.

(हेही वाचाः १०० कोटींच्या पत्रावर दोन कोटीच्या पत्राचा उतारा!)

शिवसेनेचे हे नेते सध्या अडगळीत?

एकीकडे शिवसेनेत आणि विशेषतः मातोश्रीवर अनिल परब यांचे वजन वाढलेले असताना माजी मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारखे नेते अडगळीत पडल्याची भावना सध्या जुन्या-जाणत्या शिवसैनिकांमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांचे देखील पंख कापले जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या महत्वाच्या निर्णयात जिथे अनिल परब दिसतात, तिथे हे मंत्री मात्र मागे पडत चालले की काय, अशी भावना काही शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. रामदास कदम असतील, दिवाकर रावते असतील यांच्या मनातील खदखद थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसून आली होती. दिवाकर रावते यांनी तर मी वर गेल्यावर बाळासाहेब ठाकरे यांना काय उत्तर देऊ, असे देखील भर सभागृहात म्हटले होते.

पक्षातले वजनही वाढले, नाराजीही वाढली

2001 पासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या अनिल परब यांच्याकडे महत्वाच्या जबाबदा-या गेल्या काही वर्षांत देण्यात आल्या. शिवसेनेची कोणतीही कायदेशीर बाजू असू दे, परब आजही ती चोख पार पाडतात. म्हणूनच त्यांना 2004 ते 2018 पर्यंत परिषदेवर शिवसेनेने पाठवले. मात्र 2015 नंतरच्या वांद्रे पोट निवडणुकीनंतर अनिल परब यांचे मातोश्रीवरील वजन इतके वाढले की, 2019ला ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवत, परिवहन मंत्रीपदाची माळ अनिल परब यांच्या गळ्यात घालण्यात आली. तेव्हापासूनच काही नाराज जुन्या-जाणत्या शिवसैनिकांमध्ये परबांविरोधात धुसफूस वाढू लागली आहे. आता तर ही धुसफूस इतकी वाढली की, अनिल परबांवर होणा-या आरोपांमुळे शिवसेनेतल्या एका गटात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.

(हेही वाचाः काय आहे वाझेने लिहिलेल्या पत्रात? मंत्र्यांवर केले कोणते आरोप? वाचा…)

काय आहेत परब यांच्यावरील आरोप?

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टींना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करुन घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावून सांगितले, असा खळबळजनक आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेत, हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचाः माझ्यावरील आरोप खोटे, चौकशीला तयार! अनिल परब यांचा वाझेंच्या आरोपावर खुलासा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.