छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या जाणता राजा या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च या कालावधीत होत आहे. या ऐतिहासिक महानाट्याच्या प्रयोगाला मनसेचे अध्यक्ष व संस्थापक राज ठाकरे यांनी सहकुटुंब उपस्थित राहिले. त्यामुळे या महानाट्या प्रयोगाला उपस्थित राहणाऱ्या राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे फलक अॅड. आशिष शेलार यांनी लावले होते. एका बाजूला मनसेशी भाजप जुळवून घेत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक खुद्द भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी जाणता राजा या मथळ्याखाली लावल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.
( हेही वाचा : ठाकरे गटातील गळती थांबेना! आता निकटवर्तीय माजी मंत्री दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश )
नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून या प्रयोगाचे आयोजन मुंबई भाजपच्या वतीने अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत जाणता राजा महानाट्याचे प्रयोग शिवाजीपार्कवर भव्या आणि आकर्षक मंचावर होत आहे. या जाणता राजाचे प्रयोग रविवारी १९ मार्चपर्यंत सायंकाळी ६.४५ वाजता होणार आहे.
मंगळवारी या शुभारंभाच्या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यामुळे स्वागोतोत्सुक व आयोजक असलेल्या अॅड. आशिष शेलार यांनी जाणता राजा या मथळ्याखाली देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांचे फलक प्रदर्शित केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे फलक शेलार यांनी लावल्यानंतर बुधवारी या प्रयोगाला उपस्थित राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक शेलार यांनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लावले होते. राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक मनसेच्या नेत्यांकडून लावले जाणे सर्वसाधारणपण गृहीत धरले जाते, परंतु शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष असून त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावताना जाणता राजाच्या मथळ्याखाली प्रदर्शित केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी भाजपलाही शालजोडीतील मारत सूचक इशारा दिला होता.
Join Our WhatsApp Community