‘ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड’, पडळकरांचा गंभीर आरोप

79

एसटी कर्मचा-यांचे आंदोलन दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. कर्मचा-यांच्या आत्महत्या व संपावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा : बॉम्बची भाषा करणारे लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत, शेलारांचा घणाघात )

परबांना उद्रेक घडवायचाय

गोपीचंद पडळकर आरोप करताना म्हणाले, ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा झाला आहे. त्यांना एस.टी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही. हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालंय. एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावर बिकट परिस्थिती असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचं असतं. पण यांनी कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाद्वारे धमकी देणे. जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय. जेणेकरून पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. असे, गंभीर आरोप करून पडळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

जनतेला आवाहन

सरकारच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहिल. असे, सांगत पडळकरांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आवाहन केले आहे. तुमच्या सुखा-दुखात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.