राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील दोन दिवसात पक्षांच्या बैठकांचे सत्र होणार आहे. मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक होत आहे. तर बुधवारी ५ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या बैठका होत आहेत. राष्ट्रवादीतील बैठकीच्या निमित्ताने मुंबईत दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत बहुसंख्य आमदार गेल्याने काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनातील पक्ष कार्यालयात होणार आहे. या बैठकीला पक्षाचे दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत बदलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळणार?)
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत फूट पडल्याने आता पक्षाची पुढील दिशा नेमकी काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना भवनात बैठक होत आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे आपली भूमिका स्पष्ट करतील.
पक्षात उभी फूट पडल्यानंतर ५ जुलैला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी बैठका आयोजित केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार आहे. तर अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये होईल. या बैठकीत दोन्ही गटाकडून पुढील दिशा ठरवली जाईल. त्यामुळे या बैठकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community