मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पण आमदारांच्याच वाटेवर आता शिवसेनेचे खासदारही असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीला शिवसेनेचे सात खासदार गैरहजर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शिवसेनेसमोर आपले खासदारही वाचवण्याचे आव्हान आहे.
उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदारांनी केली आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री बंगल्यावर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेच्या संसदेतील एकूण 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदार उपस्थित असल्याचे समजत आहे. राज्यसभेतील दोन तर लोकसभेतील केवळ 12 खासदारांनी या बैठकीला हजेरी लावली आहे.
(हेही वाचाः शिवसेनेला आता चिन्हाची चिंता, निवडणूक आयोगाकडे धाव)
शिवसेनेचे लोकसभेत 19 तर राज्यसभेत 3 खासदार आहेत. राज्यसभेतील खासदारांमध्ये प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे दोन खासदार बैठकीला उपस्थित असून, अनिल देसाई हे दिल्लीला असल्यामुळे ते या बैठकीला गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर लोकसभेतील 19 खासदारांपैकी केवळ 12 च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत.
बैठकीला उपस्थित खासदार
- गजानन कीर्तिकर
- अरविंद सावंत
- विनायक राऊत
- हेमंत गोडसे
- धैर्यशील माने
- प्रताप जाधव
- सदाशिव लोखंडे
- राहुल शेवाळे
- श्रीरंग बारणे
- राजन विचारे
- ओमराजे निंबाळकर
- राजेंद्र गावीत
सात खासदार अनुपस्थित
- भावना गवळी (यवतमाळ-वाशिम)
- संजय जाधव (परभणी)
- संजय मंडलिक (कोल्हापूर)
- हेमंत पाटील (हिंगोली)
- श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली)
- कृपाल तुमाने(रामटेक)
- कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली)