निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात; Sharad Pawar यांच्या विधानाने खळबळ

वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. उद्धव ठाकरे यांची देखील विचारसरणी आमच्यासारखीच आहे त्यामुळे ते सोबत आहेत. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी जवळून पाहिली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

165
Sharad Pawar यांनी ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाचे सुतोवाच का केले?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली असून कोणते पक्ष विलीन होतात याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

या मुलाखतीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, असे सूचक विधान केले आहे. काँग्रेस आणि आम्ही वैचारिकदृष्ट्या गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. उद्धव ठाकरे यांची देखील विचारसरणी आमच्यासारखीच आहे त्यामुळे ते सोबत आहेत. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी जवळून पाहिली आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

१९७७ सारखी परिस्थिती होणार

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, देशात यावेळी १९७७ परिस्थिती होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षासोबत विविध पक्ष एकत्र आले. त्यांनी सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. तेव्हाही आताच्या प्रमाणे विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांच्या नंतर पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाई यांच्यापेक्षा राहुल गांधी जास्त लोकप्रिय आहे. त्यांचा स्वीकार केला जात आहे. त्यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. त्यांचे सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये संबंध निर्माण होत आहेत.

(हेही वाचा Vidhan Parishad : राज्याच्या विधान परिषदेतील ४ जागांसाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?)

बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित

मुलाखतीत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध “अंडरकरंट” जाणवत आहे. तसेच २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत फरक आहे. अनेक जण भाजपऐवजी विरोधीपक्षांसोबत येत आहे. एका मोठ्या वर्गाला भाजप आणि (नरेंद्र) मोदी आवडत नाहीत. तसेच गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत पवार म्हणाले की, जे लोक भाजप आणि मोदींसोबत गेले आहेत, त्यांना राज्यातील लोक पसंत करत नाहीत, असे पवार म्हणाले.

काय आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया? 

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा नवीन पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) त्यांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील.

तर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये येणार की नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. तसेच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेसमध्ये कुणी येणार असतील तर त्यांच्यासाठी काही अटी नसतील. ते पक्ष गांधी परिवाराच्या नेतृत्वाला मान्य करून चालतील. देशामध्ये सध्या जे परिवर्तनाचे वारे सुरु झालेले आहेत. त्या परिवर्तनाचे मूळ राहुल गांधी आहेत. देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.