‘काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील… एकदम ओक्केमधी हाय’, या एका वाक्याने जगप्रसिद्ध झालेल्या शहाजी बापू पाटलांचा डायलॉग आता विधिमंडळात वाक्प्रचार बनतोय की काय, अशी शंका येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच. केवळ आमदार नव्हे, आजी-माजी मंत्र्यांच्या भाषणातही बापूंच्या डायलॉगची छाप दिसू लागली आहे.
( हेही वाचा : ‘वर्षा’,’सह्याद्री’त रमणाऱ्या आयुक्तांचे आता महापालिकेत मन रमेना)
बंडखोरीनंतर गुवाहाटीला थांबलेल्या शिंदे गटात शहाजी बापू होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांच्याशी फोनवर झालेले बोलणे रेकॉर्ड केले आणि माध्यमांत शेअर केले. बापूंना त्याचा फटका बसण्याऐवजी, त्यांची अस्सल गावरान शैली लोकांना भुरळ घालून गेली. त्या १०-१५ दिवसांत बापूंचा डायलॉग प्रत्येकाच्या तोंडावर होता. अगदी डीजेवाल्यांनीही त्याचा गाण्यात वापर केला. आज इतक्या दिवसांनंतरही हा डायलॉग तितकाच प्रसिद्ध असून, विधिमंडळात सत्ताधारी-विरोधक एकमेकांना कोपरखळ्या काढताना त्याचा वापर करू लागले आहेत.
माजी मंत्री अशोक चव्हाण हे गुरुवारी राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात बोलत होते. पुरामुळे शेती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या हानीचे योग्य पंचनामे झालेले नाहीत. शासनाने केवळ नदी-नाल्यांच्या काठावरील शेतीचे पंचनामे केले. प्रत्यक्षात पिकांचे नुकसान सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. राज्यात भीषण स्थिती असताना ‘सत्ताधारी झाडी, डोंगार आणि हाटिलात ओक्केमधील असतील, पण राज्यातील शेती आणि शेतकरी ओक्केमध्ये नाहीत’, असा चिमटा त्यांनी काढला. त्याव्यतिरिक्त छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी आपल्या भाषणात बापूंच्या डायलॉगचा उल्लेख केला. विरोधकांच्या सरकारविरोधातील घोषणाबाजीतही बापूंच्या डायलॉगची छाप दिसून आली. ‘५० खोके एकदम ओके’ ही त्यांची घोषणा इतर मुद्द्यांपेक्षा लक्षवेधी ठरली.
मुनगंटीवारांनाही भुरळ
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहात प्रवेश करीत असताना वाटेत त्यांना शहाजी बापू दिसले. दोघांनीही हस्तांदोलन केले. मुनगंटीवार यांनी बापूंची विचारपूस करताना, ‘बापू कसं काय, समदं ओक्के मधी ना’, असा सवाल केला. त्यावर बापूंनी आपल्या शैलीत त्यांना उत्तर दिले आणि नमस्कारही केला. तुम्ही आता सेलिब्रिटी झालात, जगभरात फेमस झालात, अशा शब्दांत सुधीर भाऊंनी त्यांचे कौतुक केले.
Join Our WhatsApp Community