शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले, ते तळागाळात पोहोचवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंचिंग सोहळा मंगळवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. सामंत म्हणाले, मी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी जेवढा निधी मंजूर केला, तितकाच शाहीर साबळे यांच्या अध्यासन केंद्रासाठी केला. शाहीर साबळे कोण आहेत, हे पुढच्या पीढीला कळावे, यासाठी केदार शिंदे यांनी या सिनेमाच्या निमित्ताने जो प्रयत्न करीत आहेत, तो कौतुकास्पद आहे. असे चित्रपट आले तर शासनाने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे; ती आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मी केदार शिंदे यांची वकिली स्वीकारली. हरीश साळवी यांच्यासारखी फी मी काही आकारणार नाही. पण, महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट दाखवला जावा, याची तजवीज करण्याची ग्वाही यानिमित्ताने मी देतो.
(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)
२८ एप्रिलला मुख्यमंत्री हा चित्रपट पहायला येतील, त्यावेळी ते घोषणा करतील. पण, मी आज एक सांगू इच्छितो, शिवसेना-भाजपतर्फे काही वर्षांपूर्वी शाहीर साबळे यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. काही वर्षे त्याचे वितरणही झाले. आता तो सुरू आहे की माहीत नाही; परंतु पुढच्या वर्षीपासून शाहीर साबळेंच्या नावाने महाराष्ट्र शासनामार्फत पुरस्कार दिला जावा, यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री त्यासाठी मान्यता देतील, याची मला खात्री आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
ते शिंदे… म्हणून कार्यक्रमाला यावेच लागले
मंत्र्यांना कोणत्याही कार्यक्रमाला जाताना ब्रीफ नोट दिली जाते. माझ्या अधिकाऱ्यांनी मला केदार शिंदेंबद्दल नोट दिली. त्यावर मी त्यांना म्हटले, हे शिंदे आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला गेलेच पाहिजे, अशी कोपरखळीही सामंत यांनी लगावली. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटासाठी राज्य शासनातर्फे जे जे करायची गरज आहे, ते ते मुख्यमंत्र्यांशी बोलून केले जाईल. शाहीर साबळेंचे कार्य पुस्तकातून पुढच्या पीढीपर्यंत पोहोचावे, यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली जाईल. शिवाय महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
Join Our WhatsApp Community