सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. एकाबाजूला शरद पवार निवृत्तीची घोषणा मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसऱ्याबाजूला जर शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेतली नाहीतर अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई यांनी राष्ट्रवादीच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांवर थेट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद अजित पवारांना देणे चुकीचे ठरेल असा सल्लाही दिला आहे.
शालिनीताई पाटील नक्की काय म्हणाल्या?
एका मराठी खासगी वृत्तवाहिनाला प्रतिक्रिया देताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, ‘शरद पवारांनी आमदार, खासदारांचं म्हणणं ऐकावं. कार्यकारिणीचं म्हणणं ऐकावं आणि मग योग्य तो निर्णय घ्यावा. असं अचानक निघून जाणं बरोबर नाही. पर्याय जोपर्यंत तुमच्या नरजेसमोर नाही, तोपर्यंत तरी निघून जाणं बरोबर नाही. मला तरी कुठे निवृत्ती होता येतय. मी शरद पवारांपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ते ८० वर्षांचे आहेत मी ९० वर्षांची आहे. पण अजूनही मला लोकं निवृत्त होऊन देत नाहीत.’
(हेही वाचा – बारसूबाबत उद्धव ठाकरेंचे सरड्यासारखे रंग बदलण्याचे काम – रामदास कदम)
‘सुप्रिया सुळेंना द्यावे अध्यक्षपद’
‘अजित पवार यांच्या पाठीशी भाजपचे मोठे नेते असल्यामुळे अद्याप त्यांची ईडीकडून चौकशी झालेली नाही. हसन मुश्रीफांची १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात चौकशी होते, मग जरंडेश्वर कारखान्यात १४०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अजित पवारांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. अजित पवार हे घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. म्हणून अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरले. त्यामुळे सुप्रिया सुळेंनाच अध्यक्षपद द्यायला हवे,’ असा सल्ला शालिनीताईंनी देत अजित पवारांवर थेट आरोप केला. दरम्यान शालिनीताई पाटील या शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून ओळखल्या जातात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community