बॉम्बेहाय दुर्घटनेला ‘अ‍ॅफकॉन’चे शापूरजी पालनजी कारणीभूत!

अ‍ॅफकॉन या कंपनीला सूचना करूनही त्यांनी ओएनजीसीला 'आम्हाला वादळातही काम सुरु ठेवायचे आहे, दुर्घटना झाली तर आमची जबाबदारी', असे पत्र लिहिले होते, असे भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.

तौक्ते चक्रीवादळात बॉम्बेहाय येथे जी दुर्घटना झाली, त्यामागे राज्य सरकारने चौकशीच्या आधीच केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागितले. ओएनजीसीचे कॅप्टन राकेश यांच्या विरोधात येलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वस्तुस्थिती वेगळीच समोर येत आहे. त्याठिकाणी अ‍ॅफकॉन या कंपनीला सूचना करूनही त्यांनी ओएनजीसीला ‘आम्हाला वादळातही काम सुरु ठेवायचे आहे, दुर्घटना झाली तर आमची जबाबदारी’, असे पत्र लिहिले होते. तरीही ओएनजीसीने या कंपनीला परवानगी दिली नाही. असे असताना या दुर्घटनेत कॅप्टन राकेश जबाबदार कसे ठरू शकतात? या दुर्घटनेला ‘अ‍ॅफकॉन’चे मालक शापूरजी पालनजी जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला.

राज्य सरकार कुणाला वाचवत आहे? 

ही दुर्घटना घडल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन या मागे केंद्र सरकाराला दोषी ठरवले. तसेच ओएनजीसीवर खापर फोडले. तातडीने गुन्हे दाखल केले. यामागे सरकारला चौकशीची दिशा भरकटवायची आहे, खऱ्या गुन्हेगारांना वाचवायचे आहे, मृतांच्या नातलगांना न्यायापासून वंचित ठेवायचे आहे. राज्य सरकारला या प्रकरणात शापूरजी पालनजी या अ‍ॅफकॉन कंपनीच्या मालकाला वाचवायचे आहे, असाही आरोप आमदार शेलार यांनी केला.

(हेही वाचा : कोरोना संसर्ग : लहान मुलांसाठी टास्क फोर्सची बैठक! )

राज्य सरकार राजकारण करते!  

ओएनजीसीने वादळाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बेहाय येथील सर्व खासगी कंपन्यांना बार्ज रिकामा करण्यास सांगितले होते, त्याप्रमाणे बहुतांश कंपन्यांनी बार्ज रिकामे केले. मात्र अ‍ॅफकॉन कंपनीने त्याला नकार देत १० मे रोजी ओएनजीसीला पत्र लिहिले. त्यामध्ये आम्हाला वादळातही काम करायचे आहे, असे कळवले होते. त्याला ओएनजीसीने परवानगी दिली नव्हती, नौदलानेही त्यांना परवानगी दिली नव्हती. असे असतांना या दुर्घटनेला ओएनजीसी कशी कारणीभूत ठरू शकते? या दुर्घटनेवरून राज्य सरकारला राजकरण करायचे आहे, असेही शेलार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here