राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळालेले घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध करावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या 19 मार्चच्या सुनावणीत दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाने तशी जाहिरात वृत्तपत्रात दिली होती. शरद पवार गटाने या जाहिरातील मजकुरावर आक्षेप घेत त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणी बुधवार, 3 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला खडेबोल सुनावले. (Sharad Pawar Ajit Pawar)
(हेही वाचा – Allahabad Court: सरसकट शस्त्रे जमा करणे अधिकाऱ्यांना पडले महागात)
जाहिरातीत न्यायालयाच्या आदेशातील वाक्य नाहीच
अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन केले नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Nationalist Congress Party) मिळालेले घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे, असे जाहिरातीत लिहिणे आवश्यक आहे. पण त्यांनी त्याचे पालन केले नाही. याऊलट त्यांनी यासंबंधीचा आदेश शिथील करण्याचा अर्ज दाखल केला, असा युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटातर्फे केला.
त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाला आपल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले. कोर्टाने दिलेला आदेश अत्यंत सोप्या भाषेत होता. त्याचा दुहेरी अर्थ लावण्यास म्हणजे चुकीचा अर्थ लावण्यास कोणतीही जागा नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले.
शरद पवारांचा फोटो वापरण्यास न्यायालयानेच दिला होता नकार
उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो वापरण्यास मनाई केली होती. ‘आता तुम्ही वेगळा पक्ष आहात, मग त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता? तुम्ही त्यांची साथ सोडली आहे. आता तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा लागेल. निवडणुका आल्या की, तुम्हाला त्यांच्या नावाची गरज पडते आणि निवडणुका नसल्या की नाही. आता तुमची स्वतंत्र ओळख असल्याने तुम्ही फक्त तीच वापरली पाहिजे. तुम्ही कोर्टाला असे अंडरटेकिंग द्या की तुमच्या आणि त्यांच्या पक्षात ओव्हरलॅप नाही. तुमचा त्यांच्याशी संबंध नाही आणि तुमची राजकारणात काय ओळख असेल याबद्दल तुम्ही एक प्रसिद्धीपत्रक काढा, असे न्यायालय तेव्हा म्हणाले होते. (Sharad Pawar Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community