पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल, पण…! काय म्हणाले संजय राऊत? 

काही दिवसांपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याची घोषणा केली होती, त्या मुलाखतीचा मुहूर्त आला आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीचा इतका मोठा अर्थ काढण्याची गरज नाही. या भेटीत पवार यांनी फडणवीस यांना जरूर सत्तेचा मंत्र दिला असेल, त्यावेळी त्यांनी फडणवीसांना सांगितले असेल कि, तुम्ही ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून काम करताना सरकारच्या कामात अडथळा आणत आहात, त्यावरून तुमची सत्ता पुढील १०० वर्षे येणार नाही, असे त्यांनी सांगितले असेल, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवार-फडणवीस भेटीबाबत मिश्किल भाष्य केले.

भेटीचा राजकीय अर्थ  काढू नका!

शरद पवार यांची प्रकृती थोडी खराब आहे. अशा वेळी महाराष्ट्राची संस्कृती आहे कि, त्या व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस केली जाते. राजकारणात कुणीही कायमचे शत्रुत्व बाळगत नाही. त्यामुळे फडणवीस हे पवारांच्या भेटीला गेले असतील. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वांनाच भेटतात, सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये,असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : होम क्वारंटाईन बंद! सरकारने निर्णय घेतला मागे? )

फडणवीसांच्या मुलाखतीचा मुहूर्त आला! 

या भेटीनंतर कुठेही ऑपरेशन लोटस होणार नाही ते ना पश्चिम बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात होणार. या आधी आपण स्वतः पवारांशी भेटलो होतो, त्यानंतर पवार स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी भेटले. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. काही दिवसांपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याची घोषणा केली होती, त्या मुलाखतीचा मुहूर्त आला आहे, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here