एसटी संपावर पवारांसोबत बैठक, अद्याप तोडगा नाहीच!

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप संपवा, यासाठी सोमवारी, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी एनसीपी अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये या संपाबाबत तोडगा निघेल, अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात यावर काहीच तोडगा निघाला नाही. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामध्ये काय भूमिका घ्यायची यावर त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक संपल्यावर ते माध्यमांशी बोलत होते.

(हेही वाचा शिवसेनेची अंतर्गत पकड झाली ढिली!)

गेले तीन आठवडे चिघळत चाललेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक सुरु होती. अडीच तास ही बैठक सुरू होती. विलिनीकरणाच्या मागणीवर काय तोडगा निघू शकतो, यावर ही महत्वाची चर्चा होत होती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकारने अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होणार, यावर काय भूमिका घ्यायची याविषयी मार्गदर्शन घेतले. त्यावेळी विविध पर्यायांवरही चर्चा करण्यात आली, असेही परब म्हणाले.

हिवाळी अधिवेशनावर मंत्रीमंडळात निर्णय

हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार की मुंबईत यावर निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत होणार आहे. त्यानंतर संसदीय कार्य समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असेही परब म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here