‘भाकरी ही फिरवावी लागते, नाहीतर ती करपते’ या शरद पवारांच्या विधानानंतर त्यांनी काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची मोठी घोषणा केली होती. पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यानंतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारीचे वाटप करणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. त्यानुसार शनिवारी, १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करत इतर नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. पण यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नसल्यामुळे उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्र आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या वर्धापनादिनाच्या कार्यक्रमात शरद पवार आपल्या भाषणाच्या शेवट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत.
(हेही वाचा – निलेश राणेंविरोधात ‘जेल भरो’ आंदोलन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक)
कोणाकडे कोणती जबाबदारी?
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याव्यतिरिक्त सुनील तटकरे यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. योगानंद शास्त्री यांच्याकडे दिल्ली सेलच्या अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. तसेच के.के. शर्मा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग सांभाळणार असून फैजल यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगणा, केरळाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय नरेंद्र वानवा यांच्या सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग आणि नसीम सिद्दिकी यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, गोवाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community