महाराष्ट्राला वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, असे पंतप्रधानांचे म्हणणे म्हणजे लहान मुलाची समजूत काढण्यासारखे!

130

वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जायला नको होता, त्यासाठी तळेगाव येथे जमीन देण्याचा निर्णय झाला होता, पण आता तो प्रकल्प गेल्यावर त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. काही जण म्हणतात की, चर्चा करून हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा, पण तसे काही होणार नाही. आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे आश्वासन दिले आहे, हे म्हणजे लहान मुलाची समजूत काढण्यासारखे आहे, अशी टीका एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मोदी-शहांमुळे गुजरातला फायदा

केंद्राची सत्ता हातात असेल तर काही राज्यांना ती अनुकूल ठरते, त्यानुसार जर गुजरातला फायदा होत असेल तर त्यावर तक्रार करण्यात काही अर्थ नाही. मोदी-शहा तिकडचेच आहेत. मोदींचे २-४ महिन्यांचे दौरे काढले तर त्यांचे कोणत्या राज्यात जास्त दौरे निघाले हे समजेल, साहजिकच प्रत्येकाला घराची ओढ असते, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

(हेही वाचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत उदय सामंतांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “केवळ चर्चा, लेखी व्यवहार…”)

राज्याचे नेतृत्व थंड

याआधी वेदांताचा आणखी एक प्रकल्प रत्नागिरीत येणार होता, मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्यावर लागलीच त्यांनी तो प्रकल्प चेन्नईला हलवला, त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येणार का, हे शेवटपर्यंत ठरत नाही. आतापर्यंत कोणतीही परदेशी गुंतवणूक करायची असेल तर प्रथम क्रमांक महाराष्ट्राचा होता, कारण येथील नेतृत्व होते. आता सर्व यंत्रणा थंड झाली आहे, भरपूर जेवण झाल्यावर ढेकर दिला जातो अशी राज्यातील नेतृत्वाची अवस्था झाली की काय, असे मला वाटते. आता दोन्ही बाजूने एकमेकांना दूषणे देणे बंद करून राज्याच्या विकासावर चर्चा केली पाहिजे, असेही पवार म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार काय अजून मला दिसला नाही, पण राज्यप्रमुख गतिमान आहे, गतीशीलतेने ते राज्य समजून घेण्यासाठी फिरत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांना पवार म्हणाले.

केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा नवीन कार्यक्रम

साधन, संपत्ती आणि सत्ता याचा वापर करून स्थिर सरकार अस्थिर करायचे आणि आपल्याला हवे तसे सरकार बनवायचे हे आपण गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाहिले आहे. केंद्राच्या सत्ताधारी पक्षाने हा नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे, अशा प्रकारे पवार यांनी गोव्यातील आॅपरेशन लोटसवर भाष्य केले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा अजून विचार करत नाही, महाराष्ट्रात यायला खूप अवकाश आहे, असे सांगत अमेठीप्रमाणे बारामतीमध्येही परिवर्तन घडवू असे भाजपा म्हणत आहे, हा त्यांचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.